पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुबळा होण्याची अपेक्षा आपण ठेवू नये. अनुनयाचे राजकारण, मुस्लिम समाजातील जातीयवाद एकीकडे बळकट करते आणि हिंदू समाजातील जातीयवाद दुसरीकडे बळकट करते, व्यवहारांत आपले राजकारण परंपरावाद बलवान करीत जाते आहे की काय, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

चमत्कारिक समाज

आपला समाज मोठा चमत्कारिक समाज आहे. या चमत्कारिकपणाचे अतिशय मार्मिक वर्णन एकदा एस्. एम्. जोशी यांनी एका व्याख्यानात केले होते. ते म्हणाले, जातिभेदांवर आणि भांडवलशाहीवर विश्वास नसणाऱ्या एका समाजवादी ब्राह्मणाने जर एक शाळा काढली तर पुढील दहा वर्षांत असे आढळून येते की त्या शाळेत जातिभेदांवर विश्वास नसणारे भांडवलशाहीचे विरोधक असे पंचवीस समाजवादी ब्राह्मण एकत्र गोळा झालेले आहेत आणि हा नियम सर्व जातींना लागू आहे. कारण सर्वच जातिजमातींत आपापल्या जातींच्याविषयी ममत्व आहे. शेतकरी कामगार पक्ष हा मराठ्यांचा पक्ष आहे असे काही त्या पक्षाने घोषित केलेले नव्हते. 'सर्व मराठ्यांनी एकत्र या' अशी हाकही त्यांनी दिलेली नव्हती. मराठा जातीच्या हित रक्षणासाठी अमूक अमूक कार्यक्रम घ्या, अशी मागणीही शेतकरी-कामगार पक्षाने कधी केली नाही, पण व्यवहारात तो मराठ्यांचा पक्ष राहिला. रिपब्लिकन पक्षाचे स्वरूप असेच आहे.

केवळ दलितांच्या संघटनेची कालविशिष्ट गरज संपलेली आहे ही बाब लक्षात घेऊन एका व्यापक पायावर सर्वसमावेशक पक्ष उभारावा अशी भूमिका डोळ्यांसमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची कल्पना केली. त्यांच्या महानिर्वाणानंतर हा पक्ष स्थापन झाला. व्यवहारात हा पक्ष पूर्वी महार आणि आता बौद्ध असणाऱ्या लोकसमूहाचा पक्ष झालेला आहे आणि त्यातही नानाविध गट व पंथोपपंथ पडलेले आहेत. याचा अर्थ हा की आपल्या राजकीय संघटनात जात-जमात खूपच प्रभावी आहे.

।३१