पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागू पडतो. याच्याउलट चित्र ब्राह्मण समाजात आहे. ब्राह्मण समाजात घर नाही, शेत नाही, जवळ पैसा नाही असे अत्यंत हालाखीचे कनिष्ठ व दरिद्री जीवनमान जगणारे लोक जागोजाग आपल्याला दाखवता येतात, पण एकूण ब्राह्मण जात म्हणून आपण विचार करू लागलो तर या जमातीत शेकडा वीस इतके लोक सधन आणि वरिष्ठ मध्यम वर्ग यात समाविष्ट झालेले आढळतात. शेकडा पासष्ट ते सत्तर पर्यंतचे लोक कनिष्ठ मध्यम वर्गात समाविष्ट झालेले दिसतात. म्हणून जात या नात्याने विचार करता ब्राह्मण ही जात मध्यम वर्गात समाविष्ट करावी लागते. सर्वच जातींच्यामध्ये सधन श्रीमंत माणसे आहेत, सर्वच जातींच्यामध्ये अतिशय दरिद्री लोक आहेत, हे जरी मान्य केले तरी स्थूलमानाने वरिष्ठ जाती आणि कनिष्ठ जाती, हे चित्र बरोबरच आहे, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. एकेका जमातीत आणि जातीत प्रत्येकाचे सर्व भाऊबंद आणि सोयरे जमा होत असल्यामुळे या जातींच्याविषयी परंपरागत ममत्वबंध अतिशय बलवान माहे म्हणूनच जात हा राजकीय शक्तीचा आधार होतो.

चमत्कारिक पेच

अशा अवस्थेत व्यवहारात वर्ग-वर्ण समन्वयाचे राजकारण चालवावे कसे, हा एक मोठा विवाद्य प्रश्न होऊन जातो. यामुळे वारंवार ही गोष्ट सांगावी लागते की, वर्ग:वर्ण समन्वयाचे राजकारण जातिव्यवस्था बळकट करण्यासाठी नसून जातिव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी असते ! या ठिकाणी येऊन आपण स्वतःलाच निरनिराळे प्रश्न विचारायला पाहिजेत. स्वातंत्र्यपूर्व काळात याबाबत दोन परस्पर भिन्न भूमिका मांडण्यात आल्या. एक भूमिका ही की, एकेक जात, एकेक जमात संघटित करावी आणि मग क्रमाने या सर्व संघटना एकत्र आणाव्यात. या बाबतीत भिन्न भिन्न पातळीवर व्यापक आणि संकुचित मते निर्माण होऊ शकतात. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, कऱ्हाडा ब्राह्मण अशा संघटना निर्माण कराव्यात हा एक उपक्रम आहे. ब्राह्मणेतर समाजात विश्व

२०।
। २७