पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मा पांचाळ ब्राह्मण म्हणजे सोनार किंवा माळी अगर शिंपी यांच्या संघटना आहेत, अंजुमन मेहदवी, अंजुमन तफजूल शिया अशा प्रकारच्या संघटना मुस्लिम समाजात आहेत. याच प्रकारच्या संघटना दलित समाजातही आहेत. हा या बाबतचा एक प्रकार झाला. ऋग्वेदी, यजुर्वेदी, कऱ्हाडा, कोकणस्थ अशी विभागणी न करता सर्वच ब्राह्मणांची संघटना, सर्वच मराठ्यांची संघटना सर्व पोटभेद गौण करून लिंगायतांची संघटना अगर सर्व आदिवासींची, सर्व दलितांची संघटना हा याच भूमिकेचा दुसरा भाग झाला. या सर्व संघटना उभारणारे लोक आपआपल्या जाती-जमातींचे हित पाहणारे होते असे मानण्याचे कारण नाही. उलट या मंडळींना जाती नको होत्या. जातिविशिष्ट समाजरचना ही त्यांना मोडून काढायची होती. त्यांना एकसंघ आणि एकात्म समाज अस्तित्वात आणायचा होता. पण या ध्येयापर्यंत जाण्यासाठी कुठेतरी आरंभ केला पाहिजे म्हणून त्यांनी एक आरंभबिंदू ठरवला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे यांचे ठळक उदाहरण म्हणून पाहता येईल. सर्व भारतीय राष्ट्राचा एकत्रित विचार करण्याइतकी चौरस व व्यापक वैचारिक भूमिका त्यांच्याजवळ होतीच, शिवाय ते अतिशय जहाल राष्ट्रवादी होते. फक्त महार समाजापुरता असा विचार त्यांनी केला नाही. ते सर्व दलितांच्यासाठी विचार करीत होते आणि फक्त दलितांपुरताच विचार त्यांनी केला नाही तर सर्व सवर्ण व दलित यांचा समावेश करणारा राष्ट्रहिताचा विचारही त्यांनी केला. जातिभेद मोडून सर्व समाज एकसंघ आणि एकात्म करण्याचे ध्येयच त्यांच्या डोळ्यांसमोर होते, याच्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, पण व्यावहारिक कार्यक्रम म्हणून त्यांना दलितांच्या संघटनांपासून आरंभ करावा लागला. काही नेत्यांना आपल्या विशिष्ट गटाच्या बाहेर इतर कशाचीच आस्था नव्हती. महंमद अली जीना हे याचे उत्तम उदाहरण आहे. मुसलमानांचे हितसंबंध एवढाच विचार त्यांच्या डोळ्यांसमोर होता. व्यवहारात त्यांचाही मुस्लिम समाज संघटित करणे इथूनच आरंभ होतो.

२८।