पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विस्कळीत ठेवतो, मुस्लिम जातीयवादाचे रक्षण करतो आणि मुस्लिम समाजातील जातीयवाद व परंपरावाद हिंदू समाजात असणारा जो थोडा फार सुधारणावाद आहे त्याचेही बळ खच्ची करीत असतो. सर्वच धर्मगटांबाबत जर तुम्ही परंपरावादविरोधी भूमिका घेतली नाही तर हिंदू समाजात तुमची विश्वसनीयता फारशी शिल्लक राहत नाही, हे राजकीय व्यवहार म्हणून ओळखायला हवे आणि तत्त्व म्हणून सर्वच परंपरावादाचा विरोध करणे आवश्यक असते, हे समजून घ्यायला हवे. याबाबतच्या दुबळेपणातूनच आजच्या आसाम प्रश्नाचा उदय झाला आहे. आसाममध्ये होणाऱ्या सततच्या घुसखोरीला पायबंद घालणे सोडा, या प्रश्नावर स्पष्टपणे चर्चा करणे सुद्धा आंदोलन उग्र होईपर्यंत आपण करू शकलो नाही आणि आजही आसाममधील मुस्लिम घुसखोरीविषयी पुरोगामी मंडळी फारसा विचार करायला तयार नाहीत!

जुने आणि नवे

न्या. रानड्यांच्यापासून सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांचा एकत्रित विचार करावा ही धडपड दिसते. महात्मा गांधींच्या सर्व भूमिकांत हा भाग आहे. भारतीय समाजवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून ही भूमिका घेतलेली आहे, याबाबतीत नवीन काही नाही. दुसऱ्या बाजूने पाहिले तर ही भूमिका नवीन आहे. या अर्थाने नवीन आहे की तात्त्विक विवेचनात या भूमिकेचा उल्लेख यापूर्वीही अनेकदा असला तरी प्रत्यक्ष कार्य करताना या भूमिकेची निकड आज जशी वाटू लागलेली आहे तशी पूर्वी वाटत नव्हती. आपल्या राजकारणात एक गट असा होता की ज्यांना राजकीय प्रश्नांखेरीज इतर कशाचेच महत्त्व वाटत नव्हते. ज्या मंडळींना राजकीय स्वातंत्र्य मिळाले म्हणजे पुरे झाले, उरलेली आपली समाजरचना आहे ती ठीकच आहे असे वाटत होते, त्यांचा विचार आपण बाजूला ठेऊ. पण ज्यांना आमूलाग्र समाजपरिवर्तन हवे होते त्यांनाही राजकीय लढा महत्त्वाचा आहे, तो एकदा सुटला म्हणजे बाकीचे प्रश्न स्वतंत्र

१३