पान:वय माझे पाच हजार.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ये ना एकदाच भेटीला

सारी दोस्ती ओवाळून टाकावी असा भेटावा यार साध्या गळाभेटीसाठी करावा सारा सागर पार

व्हावे एवढे लहान, ओढावी लोंबती शेंडी टोपीतून मारून हळूच टपली, करावी नजर आकाशी विलीन!

उमाळून अवचित यावा खदखदून जिव्हाळा घट्ट मिठीत घेऊन आभाळी टेकवावा झोपाळा

सोडाव्या कागदी होड्या पावसाळी पाटातून पाठी घसरावं नदीकाठी फाटक्या चड्डीनं चिखलातून

पाडावे चिंचा आवळे, दोन भरावे खिसे, लपून छपून वाटे चिमण्या दातांचे, लावून मीठ, दूर डोंगरी बसून

माराव्या टार्झनच्या गप्पा वडाच्या पारंब्या धरून मावळे स्वार गाढवावर, शिवा लाकडी तलवार उपसून

किती आठवू गड्या कोरलेल्या गमजा काळजावर पार गेलं अश्रूसंगे वाळून, कोवळं बालपण उरावर

गुंठाभर जमिनीसाठी जु आई बाच्या खांद्यावर, पण ये दोस्ता कधीतरी भेटीला ? खाऊ कांद्यासंग भाकर

नाही वाटणार भ्या घेऊ झोकं पुनः पारंब्यांवर मारू गप्पा, कोंबू खुशीत दुःखाला दोनी खिसाभर

होऊ दे रे, आम्हा रोजचाच अंधार, पेटवू पारावर मशाल बसु दे रे वस्तीला मानगुटीवर, वझं करजाचं खुशाल वझं करजाचं खुशाल... वय माझे पाच हजार / ९