पान:वय माझे पाच हजार.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

     प्राक्तन
    का तुम्ही सरळ निघुन जावे 
    विस्कटून श्वास कळ्यांचे 
    नुकतेच बिलगले होतो ना 
    गळा हात कोवळ्या चांदण्यांचे
    प्रारब्ध म्हणा दुर्दैव म्हणा
    सटवाईचे लिखाण म्हणा 
    कसे जगायचे सांगा आम्ही 
    पहायचा तरी होता ताठ कणा
    अजून ना पाठीवर फिरला हात
    ना छातीवर उघड्या नीज निवांत
    ना दिशा ना ठावे अंतर किती कोस
    सोडून चार उसासे बैठक पडली ओस
    फक्त उमलायला अवसर हवा होता 
    सुगंध नसातून घुमायला हवा होता 
    आलिंगने तुम्हां घट्ट द्यायचीच होती
    तुमचे हसायचे राहिलेच त्या इवल्या राती
    उमजले आम्हा सत्य जीवनाचे
    होऊन पोरके इथे कसे जगायाचे 
    नका व्यर्थ सांगू, दोषुनि ती नियती 
    कळले यमसदनी तेवते प्राणज्योती



                                                 वय माझे पाच हजार / ४६