पान:वय माझे पाच हजार.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

    बांधापल्याड...
  गुंफिला हात हळूच सोडवित तू स्वप्नातून जाणे
  सहज फसवशी, सदा कसे तव स्वप्नातही बहाणे 
  लोटून किती युगे गेली, निसटले ते बिलगणे
  कोण रोखतो स्वप्नांमधुन तुझे क्षणांचे येणे
  श्रमल्या दमल्या हातांची ती मिठीही आसुसलेली
  सोबत तुझी अचानकच कधी गं अशी कशी विलगली 
  खट्याळ मनाला उगा वाटते दारामागुनि तू लपलेली 
  आजच कशी गं उंबरठ्यावर तुझी पाऊले ती रुसलेली
   सुन्या आठवणी किती दाटती ओल्या भरल्या नयनी 
   उदास रात्री दिनदिनि रडती मम रोजनिशी वाचुनि
   बांध तोडुन वाहू दे निरंतर लोचनी
   नको नको गं थांब तिथे तू बांधापल्याड सजणी



४३ / वय माझे पाच हजार