पान:वय माझे पाच हजार.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जग असे असावे...

                 पुनः बसून जात्यावर रम्य पहाट उगवावी
                 हाती खुंटा बहिणासंगे नित्य मुखी ओवी यावी
                 अंगणी कुणी सडा शिंपिता काऊ कोकत यावा
                 हर्ष मनी तो बंधू येता, ये माहेरीचा सांगावा
                  सख्या सहेल्या जमून घालू पिंगा झाडाभवती
                  पंचमीच्या सणी झोका, राज्य जाय गगनावरती
                  दृष्ट काढति माय, माऊल्या भीती दाटल्या उरी
                  गालावरी तो कर मायेचा, माय बांधते तोरण दारी
                  बालगोपाल घेऊन खांद्यावरी गाव गाव मिरवीती
                  पुरे गाव लोटले उधळण्या लाड ते ग्रामकन्येवरी
                  घासभराची अवीट देवघेव प्रसाद गोडधोड घरी
                 रुते घास,नयनी गहिवर, जाय कन्या ती सासरी
                 आणि आता...
                 कुठे आहे रखुमाबाई, गेला कुठे विठुबा सावळा
                 नाही थांबला राऊळी राम, राधा शोधते घननिळा
                 कुठे बुडाले ते दिवस, कुणी तोडली रक्ताची नाती
                 गिधाडे खोळंबली कधीची, उरली रुपयांवर प्रीती
                 आधी बदलु सारे आपण, बदलेलच बघ विश्व सारे
                 नभी दाटे घन अंधार तरी लकाकती किती शुभ्र तारे
                 ही निर्मिती ईश्वराचीच, नको पडो कधी विसर देवा
                 वसुदेवाचे कुटुंब हे, भल्या पहाटे वासुदेव दारी यावा!
                 सूर गोड, मंगल, मंजुळ पहाटे पहाटे वासुदेव यावा
                 सखे वासुदेव यावा..!


                ३३ / वय माझे पाच हजार