Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वज

             काय हो आजी असं का बसलाय
             साऱ्या जगाचं दुःख पांघरून बसलाय
             काय सांगू तुला सत्तरी झाली वयाला
             घोटभर शाप पानी, कोर नाय खायला
             काय सांगू बाबा कसला संसार कसलं घर
             आभाळाचं छपार चिक्कल गुडघाभर
             दिवाळी म्हनू नको दसरा म्हनू नको
             लाज झाकायला कायम हीच लक्तरं
             आनी लाज तर कशापायी झाकायची
             लाज एकच वाटतीया, पॉट मारायची
             पोरं तर नाय बाबा उपाशी मारायची
             म्हनून धडपड, वाकून बी चालायची
             तुझं बराय बाबा झाडावरच जगायचं
             या झाडावरनं त्या झाडावर उडत रहायचं
             पोरं गुमान खात्यात पाला कशापायी उपाशी
             झाडाची फांदी टेकायला फांदीच उशाशी
             अगं म्हातारे आमची टोळी लय मोठी
             तुमच्यागत आते, मामे चुलते नाय आडकाठी
             कुनाचीबी पोरं कुनालाबी कवेत घालत्यात मिठी
              पन सांग म्हातारे तू का गं एकटी ?
              कसं सांगू बाबा, मानुस सदा अप्पलपोटी
              येक ईचारु सांगशील काय
              आमचा जगभर गोतावळा मजेत हाय
              तुमी शिकले सवरले तरी झालं काय ?
              आमी पूर्वज मानसाचे म्हणता, पटतच नाय !


              २३ / वय माझे पाच हजार