या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी आत्मा गिळला...
मी आणि माझा आत्मा काय प्रकरण आहे बुवा हे ?
ठरवलं आत्मा वेगळा करू
तेवढ्यात एक डास चावला, पटकन मारला माझ्या शरीरानं शाबासकी दिली
माझा आत्मा गालातल्या गालात हसला म्हणाला डासाच्या आत्म्याचं काय ?
तोही माझ्या आत्म्या शेजारीच होता हसत उभा अरे माझं रक्त प्यालास वर हसतोस ? ते काम माझ्या शरीराचं, माझं नव्हे मी चक्रावलोच, हे आणि कुठं शिकलास ? माणसाकडूनच! ...मी डासाएवढा उंच उडालो
म्हणाला माझं शरीर एकाला चावणार होतं तोच दुसऱ्या माणसानं त्याची मानच कापली माझ्याच सारखं हसत हसत !
डासानं दुसऱ्या डासाला चावल्याचं ऐकलंय कधी? तरी अजून मेलेल्याला चावण्याची विद्या नाही शिकलो बुवा तुमच्याकडून... मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाता ना तुम्ही ?
आता मात्र मी दचकलोच माझ्या आत्म्याला मी पटकन गिळून टाकलं तेव्हापासून माझा आत्मा घट्ट मिठीतच ठेवलाय...
--- वय माझे पाच हजार / २२