मनस्वी चित्रकार
अंतरंगी भिजवून कुंचला, येते चित्र काढता ?
पूर्ण समाधान होई तो, न थांबता न थकता
एकटक नजर होवो थक्क, चित्ती एकरूप थेट
माथा घट्ट तुज चरणी, घळघळे काजळकाठ
अंतरंगी वाहो भरुनी निळासावळा रंग
वेणूनादी रंगून राहो उभा उरी श्रीरंग
भले होऊ दे रंग ओला लेऊनि नयनजल
क्षण एक उभा रहा ना रे तू मुरारी निश्चल ?
बसतील ना रे गाई तोवर तुझ्या चित्रासाठी
विसावतील का सांग पाखरे चिडीचुप यमुनेकाठी
थबकुनि पाहिल का रे यमुना तरंगात स्मितरेखा
हे जरी ठाऊक तिजला मी चित्रकार नवखा
सांगशील श्रीकृष्णा का तू, गोपी- सवंगड्यांना
खुशाल काढोत खोड्या, मी चित्रात रंगताना
देऊ का रे निळा सावळा, रंग दूर डोंगरांना
जड जाईल का रवीला, सावळ्यात रंगताना
तरंगेल का गोधूळ आज, होऊनी निळीसावळी
घुमेल का रे घंटा, दूर मधुर शांत राऊळी ?
जमेल हे सारे पण दाटे, भयभीत मनी काजळी
वाहशील ना तोवरी तुझे ते, सूर ती भरून ओंजळी
सारी जुळवाजुळव केली, का राधा रुसून बसली
बासुरी पडता कानी, येईल का ती चोरपाऊली
क्षणभंगुर त्या पर्णावरी मी रेखु कशा स्वप्नरेखा
१७ / वय माझे पाच हजार