पान:वनस्पतिविचार.pdf/236

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

परागकण आणून पहिल्या बीजाण्डास दिले, तर त्या कणांचा उत्तम उपयोग होऊन त्यांपासून बीजें सुधारत जातील, व वरील प्रयत्नाने रोगांस न हार जाणाऱ्या वनस्पति तयार करता येतील.

 परागकण कृत्रिम रीतीनें परस्पर एकत्र आणण्याऐवजी आपोआप त्यांची नैसर्गिक व्यवस्था होते, व त्या योगाने एका फुलांतील परागकण दुसऱ्या फुलांकडे पोहोंचविले जातात. असल्या फुलांत जरूरीपेक्षा जास्त परागभुकटी असते. कारण वाऱ्याने ती उडून निरुपयोगी होण्याचा संभव असतो. ही उणीव भरून काढण्याकरितां निसर्गदेवतेने अशा फुलांत पुष्कळ परागकणांचा परागपीटिकेंत सांठा ठेविला असतो. वाऱ्याप्रमाणेच किडे, कीटक अथवा मधमाशा पराग पोहोचविण्याचे काम करीत असतात. अशा वेळेस फुलांतील रचना मनोवेधक व दिखाऊ असते. पांकळ्यांस निरनिराळे रंग असून कधी कधी त्यांस उत्तम सुवासही येत असतो. पुंकेसरांची ठेवण वर बसणाऱ्या किड्यांच्या सोयीनुरूप बनली असते. तसेच मध उत्पन्न करणारे पिंड पाकळ्यांच्या बुडाशी असतात. माशा अगर कीटक मध पिण्याकरिता फुलांत घुसून त्यांचे शरीर परागधुळीने भरून जाते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर माशा जात येत असल्यामुळे केवळ स्त्रीफुलांस परागकण मिळून त्यांचे गर्भसंस्थापनेचे काम होते.

 कित्येक फुलांत पुंकेसरदलें अति लांब अगर अति आखूड असल्यामुळे अथवा परागवाहिनी ज्यास्त वाढून पुंकेसरदलांच्या आटोक्याबाहेर असेल, तर तेथील बीजाण्डास दुसरीकडील परागकणांवर अवलंबून रहावे लागते. पाण्याचे कांठी उगवणाऱ्या झाडांच्या फुलांचें गर्भीकरण पुष्कळ वेळा पाण्यातून वाहत येणाऱ्या परागकणांकडून होत असते. कांठावरील फुलांतून परागकण पाण्यात पडून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाटू लागतो व जेथे त्याच जातीची केवल स्त्रीकेसर फुलें असतील, त्यांस त्यांचा उपयोग होत असतो. एकंदरीत निसर्ग तजवीज असल्यामुळे पुष्कळ फुलांचे गर्भसंस्थापन होऊन त्यांपासून बीजोत्पादन होते. नाहीतर सर्व केवल स्त्रीकेसर फुलें बीजोत्पादनाशिवाय सुकून जाती. तसेच केवल पुंकेसर फुलांतील परागकण वाया गेले असते, व त्यामुळे वंशवर्धनास बराच आळा पडला असता.

समाप्त.