पान:वनस्पतिविचार.pdf/235

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०९
-----

भुरका कण उत्पत्तीस कारण होतो; संयोगापूर्वी परागकण अथवा बीजाण्डांतील गर्भकोश आपआपल्यापरी उगवून वाढू लागतात. परागकणांपासून परागकण नलिका तयार होऊन त्यांत पुरुषतत्त्व उत्पन्न होते व गर्भकोश उगवून त्यांत गर्भाण्ड उत्पन्न होते, तसेच फर्नच्या भुकटीचा कण उगवून फर्नची पूर्व अस्पष्ट स्थिति उत्पन्न होते व त्यावर स्त्री व पुरुषव्यंजक अवयवें उत्पन्न होतात. स्त्री व पुरुष तत्त्वे उत्पन्न होण्यापूर्वी जशी फर्नच्या कणापासून अस्पष्ट स्थिति उत्पन्न होते, त्याप्रमाणे उच्चवर्गातसुद्धां जननपेशीं (Spore ) उगवून अस्पष्ट स्थिति तयार होते. परागकणनलिका ही पुरुषतत्व येण्यापूर्वीची अस्पष्ट स्थिति आहे. म्हणजे बीजोत्पादन होण्यापूर्वी जननपेशीची दोन स्थित्यंतरे होतात, हीं स्थित्यंतरें वनस्पतीच्या एकजीवनक्रमांत होत असतात, हे विशेष आहे.

 जेव्हां जननतत्त्वे भिन्न स्वभावाची आहेत असे सांगता येत नाही, अशा वेळेस त्यांच्या मिलाफास केवळ ' संयोग ' ( Conjugation ) हा शब्द योजितात. पण जेव्हा ती तत्त्वें स्त्री व पुरुष अशी भिन्न असून त्यांचा मिलाफ होतो, त्यास गर्भधारणा अगर गर्भसंस्थापना ( Fertilisation ) हा शब्द लाविला जातो. बुरशी, शैवालतंतु, वगैरेमध्ये जन्नतत्त्वांचा संयोग (Conjugation ) होतो; पण आंबा, फणस, गहूं वगैरे उच्चवर्गामध्यें, जननतत्वे एकजीव होऊन गर्भसंस्थापना ( Fertilisation ) होते.

 उच्चवर्गात जेव्हा एका फुलांत दोन्ही स्त्री व पुरुष अवयवे आढळत नाहींत. फक्त एकच स्त्री अगर पुरुष अवयव असते, अशा ठिकाणी त्या स्त्री-अवयवांचा दुसरीकडून परागकण मिळाल्याखेरीज कांहीं फायदा नसतो. जसा केवल स्त्रीअवयवांचा अशा ठिकाणी उपयोग नसतो, त्याप्रमाणे केवल परागकणांचा कोणी तरी उपयोग करून घेतल्याशिवाय त्यांचा असून नसून कांहीं फायदा नाही. म्हणून केवळ स्त्री-केसर फुलें, केवळ पुंकेसर फुलांचा नेहमी उपभोग करून घेत असतात. कांहीं फुलांत स्त्री व पुरुष अवयवे एके जागी असूनसुद्धां तीं परस्पर फायदा करून घेत नाहीत. त्यांतील बीजाण्डास दुसऱ्या फुलांतील परागकण ज्यास्त सुखकर वाटतात. त्यापासून उत्पन्न होणारे बीज अधिक पुष्ट व सुंदर असते. फुलांतील पुंकेसरदलें कापून जर दुसऱ्या चांगल्या सजातीय फुलांतील