पान:वनस्पतिविचार.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२००     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 ही परंपरा केवळ बीजांकडून राखिली जाते, असे नाही. तर दुसऱ्या अन्यमार्गांनीसुद्धां वंशवर्धन केले जाते. बीजे अगदी लहान असल्यामुळे त्यांपासून झाडे तयार होण्यास कालावधि लागतो, तेव्हां ते टाळण्याकरितां कलमें वगैरे करून झाडांची उत्पत्ति लवकर करण्यांत येते. नैसर्गिक कलमें आपोआप तयार होत असतात. जेथे फुले येऊन बीजोत्पत्ति खात्रीने होईल अशी शंका असते, अशा ठिकाणी नैसर्गिक कलमें होऊन त्या वनस्पतींची वंशपरंपरा कायम राहते. जाई, जुई, मोगरा, स्ट्राबेरी, रताळी, दर्भ, दूर्वा, गवते इत्यादिकांत नैसर्गिक कलमें नेहमी दृष्टीस पडतात. म्हणजे जेथे फुलामध्ये स्त्रीपुरुषसंयोग होऊन बीज तयार होण्यास त्रास असतो, अथवा स्त्रीपुरुषव्यंजक अवयवे येत नाहीत अशा ठिकाणी नैसर्गिक कलमांशिवाय उत्पत्ति कायम राहणार नाही.

 कलमें करण्यांत एक विशेष फायदा असतो. बीजांपासून अस्सल झाड तयार होईल किंवा नाही याचा नियम नसतो. शिवाय वेळ अधिक लागून उत्तम झाड तयार होईल किंवा नाही त्याची शंका जेथे आहे, तेथे कलमें करून फायदा करून घेणे हे उत्तम. कलमांमध्ये मूळ झाडाचे गुण किंचितही कमी न होत जसेच्या तसेच कलमापासून उत्पन्न होणा-या झाडांत कायम राहतात. खरोखर हा फायदा फार महत्त्वाचा समजला पाहिजे. शिवाय वेळ थोडा लागून फळेही लवकर येऊ लागतात. ही गोष्ट खरी कीं, बीजांपासून उत्पन्न होणारी झाडे जितकी वर्षे टिकतात, तितकी वर्षे कलमांची झाडे टिकणार नाहीत. पण मूळ गुणांचा कायमपणा, तसेच लागणारा थोडा काल, ही लक्ष्यांत घेतां कलमांपासून झाडे तयार करणे हे ज्यास्त श्रेयस्कर अाहे. स्त्रीपुरुषतत्वांचा संयोग झाल्यावर बीज तयार होऊन जमिनीत पडून उगवून येण्यास बराच काल लागतो. शिवाय रोपा वाढून फळे लवकर मिळत नाहीत. व्यक्तिमात्र झाडाप्रमाणे फळे येण्यास बराच काळ जावा लागेल. पण कलमांत स्त्रीपुरुषतत्त्वांच्या संयोगाची जरुरी नसून, मूळ झाडांची फांदी अगर फांटा जमिनीत पुरून जमीन ओली राहील अशी व्यवस्था केली म्हणजे त्यापासून रोपा फार जलद तयार होऊन फळेही लवकर येऊ लागतात.

 कलमें करण्याचे निरनिराळे प्रकार असून त्यांच्या वेळाही वेगवेगळ्या आहेत. काही झाडांत थंडी पडू लागली असतां कलमें करितात, व काहीं मध्ये