पान:वनस्पतिविचार.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३ वे ].    बीज.    २०१
-----

कलमांस पावसाळा हवा असतो. विशेषेकरून जेव्हा झाडांतील रसाचे जोमानें अभिसरण होत असते, अशा वेळेस कलमें उत्तम साधतात, व हीच वेळ त्यांस योग्य असते. फाटे लावणे ( Cutting ), दाबाचें कलम करणे, अगर जडवें बांधणे ( Layering ), फांदीवर फांदी घेणे ( Grafting ), डोळे भरणे { Budding) वगैरे प्रकार कलमांचे आहेत.

 फांटे लागण्यास फांद्या चांगल्या जाड व टणक पसंत करून त्यांची रुंदी सुमारे एक बोटाइतकी ठेवावी. फांट्याची लांबी एक फुटापासून दीड फूट असावी. ज्या फांट्यांवर कळ्या असतील ते फाटे पसंत करावेत. हे फाटे दीड इंच जमिनीत पुरून वरच्या टोकांस शेण लावून ठेवावे. रोज दोन वेळा पाणी देत जावे. त्या कळ्यांमधून नवीन पाने हळू हळू फुटतात, व जमिनीत आगंतुक मुळ्या ( Adventitious roots ) निघतात. मुळ्या फुटल्या म्हणजे रोपा रुजला असे समजावे. अशा रीतीने गुलाब, जासवंदी, कण्हेर, पांढराचाफा, क्रोटन, वगैरेची कलमें करितात.

 फांदी वाकवून, जमिनीत घुसवून त्यावर थोडी माती टाकून दाबून कलम करावें. अशा प्रकारच्या कलमास दाबाचे कलम ( Layering ) म्हणतात. जाई, जुई, लिंबू , क्रोटन वगैरेमध्ये अशी कलमें नेहमी करण्यात येतात. मागे खोडाचे वर्णन करतांना नैसर्गिक दाबाचे कलम कसे होत असते, ह्याविषयी सांगितलेच आहे. फांदीस योग्य परिस्थिति उत्पन्न करून आगंतुक मुळ्या (Adventitious roots) सोडावयास लावणे हे मुख्य तत्त्व अशा कलमांत असते. कित्येक वेळां शैवाल, फांदीवर सांध्यापाशी बांधून, सांध्यावर आडवी खाप करतात. नेहमी दोन वेळा पाण्याची व्यवस्था राखण्यांत येते. आडव्या खापेतून वेगळ्या मुळ्या फुटून त्या शैवाळांत शिरतात. पुढे ती फांदी चाकूनें कापून दुसरे जागी लावण्यात येते. त्या नवीन सुटलेल्या मुळ्या आयत्या जमिनीत शिरून अन्नग्रहण करू लागतात. अशा रीतीने साखरलिंबू, संत्रा, गुलाब, जांभूळ वगैरेमध्ये कलमें पुष्कळ वेळां करितात. फांदी वांकवून जमिनीत पुरणे किंवा फांदीवर कृत्रिम जमिनीसारखी व्यवस्था करणे, ह्या दोन्ही गोष्टी एकच असतात.

 आणखी एक प्रकारचे कलम आहे की, ज्यामध्ये एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडावर बसवून त्याचा त्या फांदीशी एकजीव करितात. आंबा, लोकॅॅट,