पान:वनस्पतिविचार.pdf/225

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३ वे ].    बीज.    १९९
-----

आदिमूल अगर प्रथम खोड ह्या दोन्हींपेक्षां बीजदलें नेहमी मोठी व स्पष्ट असतात. बहुतकरून एकदलवनस्पतींत आदिमुल (Radicle ) खोडापेक्षा लहान असून जाड असते. कांद्याच्या बीजांत गर्भ अर्धचंद्राकृति असतो. बहुदलधान्यवनस्पतींत बीजदलें दोन्हीपेक्षा अधिक असतात. जेव्हां गर्भाबाहेर मगजाचे आवरण नसते, त्यावेळेस बीजदले जाड व मांसल होतात. तसेच जेव्हां ते आवरण असते, त्यावेळेस बीजदले पातळ पानांसारखी असतात. बीजदलें देंठविरहित असून त्यांचे किनारे सारखे असतात. अमरवेलाच्या बीजांत बीजदले नसून येथील गर्भ पातळ सुतासारखा व मळसूत्री असतो. खरोखर अमरवेल उच्चवर्गीपैकी द्विदलधान्य-वनस्पतीमध्ये मोडत असून त्यास बीजदले वाढत नाहीत, हा अपवाद आहे. नाहीतर नियमाप्रमाणे येथे दोन बीजदलें असली पाहिजेत.

 येथे ही गोष्ट नमूद करणे जरूर आहे की, जर बीजे मगजवेष्टित असतील, तर त्यांतील गर्भ मगजाच्या लहान मोठ्या आवरणाप्रमाणे लहान मोठा असतो, म्हणजे मगजाचे आवरण लहान व पातळ असेल तर गर्भ ज्यास्त मोठा आढळतो. तसेच ते आवरण मोठे असतांना गर्भ संकुचित व लहान असतो. तृणजातींतील बीजांमध्ये बीजाच्या आकारमानाने मगजाचा साठा मोठा असल्यामुळे त्यांचा गर्भ नेहमी लहान असून एका कोपऱ्यांत असतो. पण उलटपक्षी नेट्लमध्ये गर्भ मोठा असून मगजसांठा पातळ असतो.

 बीजे जमिनीत योग्य परिस्थितीत पेरली असतां उगवून त्यांपासून लहान रोपे तयार होतात; व पुढे त्या रोप्यांवर पुनः बीजे येतात. जमीन, हवा, पाणी व उष्णता इतक्या गोष्टीची बीजजननास आवश्यक जरूरी आहे. पाणी मिळाले असतां बीज फुगून आंतील सजीवतत्त्व जागृत होते. बीजांतील पोषक सत्त्व रूपांतर पावून त्यापासून पूर्वी वर्णन केलेले अंकुर बाहेर पडतात. दिवसेंदिवस तें पोषक सत्त्व कमी होत जाऊन रोप्याची वाढ चांगली होते. पुढे त्यावर पाने, फांद्या वगैरे येतात. शरीरवाढ पूर्ण झाल्यावर हळुहळू फुले येऊ लागतात. फुले फुलून परागपतन परागवाहिनीवर होऊन गर्भधारणा पूर्ण होते. त्यापासून फळे तयार झाल्यावर फळांमध्ये बीजें पोसतात. ह्याप्रमाणे बीजापासून पुनः बीज तयार होऊन झाडांची परंपरा कायम राहते.