पान:वनस्पतिविचार.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १७९
-----

बाजूस कोंवळ्या कळ्या येत असतात, त्यास अनियमित Indefinite मोहोर असे समजतात. तंबाखू, लिंबू, ड्युरान्टा, आंबा वगैरेमध्ये असला अनियमित मोहोर आढळतो.

 कधी कधी एकाच झाडावर दोन्ही नियमित व अनियमित मोहोर आढळतात. वास्तविक एका झाडावर एकच प्रकारचा पुष्पमोहोर असावा असा साधारण नियम असतो; पण जेव्हां दोन्ही प्रकारचे मिश्रण आढळते, तेव्हां ते प्रकार ह्या नियमास अपवादच आहेत. सूर्यकमळ, तुळस, गुलाब, वगेरेमध्यें असले मिश्र प्रकार आढळतात.

 नियमित मोहोरांमध्ये फुलांची वाढ मध्यबिंदूपासून बाहेर परीघाकडे असते व अनियमित प्रकारांत उलट परिघाकडून मध्यबिंदूकडे असते. नियमित प्रकारांत फुलांची वाढ उतरत असते. प्रथम टोंकावरील फुलांची वाढ पूर्ण होऊन नंतर खालील फुलांची वाढ होत असते. कधी कधी अग्राकडे एकच फूल असते. अथवा प्रत्येक पानाचे पोटी एक एक फूल येते. हे दोन्ही प्रकार नियमित (Definite) च आहेत, अनियमित प्रकारांत फुलांच्या वाढीची दिशा चढती असुन फुलें खालून वर वाढत असतात. अग्राकडे नेहमी कळ्या असतात अथवा अगदी कोवळी फुले असतात. साधारणपणे समोरासमोर (Opposite) व वर्तुळाकृती (Whorled ) पानांची मांडणी ज्या वनस्पतींत असते त्यामध्ये नियमित मोहोर अधिक आढळण्याचा संभव असतो. तसेच जेथे पाने ' एक झाल्यावर एक ' ( Alternate ) असतात, त्या ठिकाणी पुष्कळ अंशी अनियमित मोहोर आढळतो.

 पुष्पदांडी लांब अगर आखूड तसेंच रुंद अथवा मांसल असते. अंतरकांड्यांच्या कमी अधिक वाढीप्रमाणे फुलें एकमेकांपासून कमी अधिक अंतरावर येतात. अंतरकांडी संकुचित असली तर, फुलांचे गुच्छ बनतात.

 आतां आपण अनियमित मोहोरामध्ये आणखी कांहीं पोटभेद आहेत, तिकडे लक्ष्य देऊ. मुळे, मोहरी, ड्युरांन्टा, वाटाणे, हरभरे, वगैरे फुलांत एक साधारण पुष्पदांडी असून त्यावर लहान देंठ आलेले असतात. हे लहान देंठ व्यक्तिमात्र फुलांचे होत. अग्राकडे कळ्या असून बुडाकडे जुनी फुले असतात, हा अनियमितापैकी पहिला प्रकार आहे. ह्यास मंजिरी (Raceme) ही संज्ञा योग्य आहे.