पान:वनस्पतिविचार.pdf/208

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१८०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 फुलगोभी, मोहरीची पहिली फुलें, आळीव, वगैरेमध्ये फुलांचा झुपका बनतो. येथेही साधारण एक दांडी असून त्यावर प्रत्येक फुलाची उपदांडी असते. उपदांड्या कमी अधीक लांबीच्या असतात. बुडाकडे उपदांडी अधिक लांब असून वरवर उपदांड्या आंखुड आंखुड येत जातात. त्यामुळे त्यावरील सर्व फुले एकाच रांगेला येतात. त्यास बृहन्मंजिरी ( Corymb ) म्हणतात. जशी जशी ती अधिक जुनी होत जाते, त्याप्रमाणे ती पुष्पदांडी (Peduncle) अधिक वाढून फुलें खाली राहत जातात. अशावेळी त्यास अगदीं मंजिरीसारखा ( Raceme ) आकार येतो. म्हणजे बृहन्मंजिरी व मंजिरी हे दोन्ही बहुतेक एकच प्रकार आहेत.

 धने, गाजर, सोवा, शोपा, जिरे, ओवा वगैरेमध्यें, फुले पुष्पदांडीच्या एका सांध्या पासून निघून प्रत्येक फुलास वेगवेगळी उपपुष्पदांडी असते. ह्या उपदांड्यांस जणू छत्रीच्या काड्यासारखा आकार असतो. ह्या काल्पनिक छत्रीच्या आकारावरून त्यास छत्रस्तबक ( Umbel ) म्हणतात. सांध्यापाशी सुतासारखी उपपुष्पपत्रे ( Bracts ) असतात. एखादी दुसरी उपपुष्पदांडी अधिक वाढून त्यावर पुनः पहिल्याप्रमाणे पुनः छत्रस्तबक ( Umbel ) होते. जसे-गाजर, धने, वगैरे.

 बृहन्मंजिरी व छत्रस्तबक ह्या दोन्ही प्रकारांत मुख्य फरक म्हणजे, पहिल्यांत उपदांड्या वेगवेगळ्या जागेपासून उत्पन्न होतात, व दुस-यांत उपदांड्या एकाच सांध्या (Node ) पासून उत्पन्न होतात.

 वरील तिन्ही प्रकारांत फांद्यावर फांद्या येऊन त्या प्रकारांचे द्विगुणित भाव झाले असतात. तंबाखू, बटाटे, फुटाणे ( Tecoma ) वगैरेमध्ये मुख्य मोहोर, तसेच पोट मोहोर, हे दोन्ही मंजिरीचे प्रकार आहेत. अशीच स्थिति फुलगोभीमध्ये असते. त्यामुळे त्यास संयुक्त बृहन्मंजिरी ( Compound Corymb ) म्हणतात. संयुक्त छत्रस्तबक ( Compound Umbel ) धने, गाजर वगैरेमध्ये असते, हे वर सांगितलेच आहे.

 वरील तिन्ही प्रकारांमध्ये फुलांस लहान देठ असतात. पण आणखी एक प्रकार असा आढळतो की, तो अनियमित असून व्यक्तिमात्र फुलांस देंठ असत नाहींत. जसे-केवडा, मका, वुइलो, ओक, अॅकॅलिफा वगेरे. केवडा