पान:वनस्पतिविचार.pdf/205

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १७७
-----

अळु, सुरण वगैरेमध्ये अशाच प्रकारचे उपपुष्पपत्र फुलाच्या मोहोराभोंवतीं असते. प्रथम उपपुष्पपत्र फुटून त्यांतून फुलांचा गुच्छ बाहेर दिसू लागतो. पिंपळ, वड, अंजीर वगैरेमध्ये लहान आवरणे फळाच्या अग्रावर असतात. पानशेटियामध्ये उपपुष्पपत्रे तांबड़ीं अगर पिवळी असतात. बोगनवेलीमध्यें तीं गुलाबी रंगाची असतात. ही पुष्कळ वेळा फुलें आहेत, असे वाटते, पण एक एक उपपुष्पपत्राच्या आंत एक एक फूल चिकटलेले आढळते. झेंडू, कॉसपॉस वगेरे, फुलांत उपपुष्पपत्रे परस्पर चिकटून त्यास पेल्यासारखा आकार येतो. सूर्यकमळ कुसुम वगैरेमध्ये सुद्धा उपपुष्पपत्राच्या एकावर एक रांगा फुलाच्या बुडी येतात. गाजर, धने, शोपा वगैरेमध्ये उपपुष्पपत्रे सुतासारखी बारीक असतात, अॅॅकाॅॅर्न नांवाच्या फळाचे बुडी उपपुष्पपत्राचा कांहीं भाग पेल्यासारखा फळांवर वाढतो. ओकवृक्षाची फळे ह्याच प्रकारची असतात. गहू, जव, वगैरेमध्ये नावेसारखी उपपुष्पपत्रें आढळतात. गव्हांची ओंबी पाहिली म्हणजे, वर दिसणारी आवरणे सारी उपपुष्पपत्रेच आहेत असे वाटते. प्रत्येक गुच्छामध्ये तीनपासून सहापर्यंत उपपुष्पपत्रे असतात. आंतील पांढऱ्या रंगाच्या उपपुष्पपत्रांत एक एक फूल असते. ज्याप्रमाणे पानाचे पोटांत कळी उमलून फांदी वाढते, अथवा जेथे म्हणून पानाचे अस्तित्व त्या ठिकाणी कळीचेही अस्तित्व असून ती कळी उमलो अगर जळून जावो, त्याप्रमाणे उपपुष्पपत्राचे पोटांत पुष्पकळी असून तिजपासून फूल उमलते अथवा गळूनही जाते. भेंडी, जासवंदी वगैरेमध्यें पुष्पकोशाखाली उपपुष्पपत्र वर्तुळ असते, असे मागें सांगितले आहेच. कापसाच्या बोंडाखालीं तीन उपपुष्पपत्रे असतात.

 एकंदरीत उपपुष्पपत्रे वेगवेगळ्या आकाराची, निरनिराळ्या रंगाची व कमी अधिक जाडीची असतात. उपपुष्पपत्रे पानांप्रमाणेच कमी अधिक दिवस पुष्प दांडीवर राहतात. मोहोर अगर पुष्पगुच्छ ह्यास एक साधारण उपपुष्पपत्र असून प्रत्येक व्यक्तिमात्र फुलासही वेगळे उपपुष्पपत्र असते. जो संबंध पानांचा व फांद्याचा असतो तोच संबंध उपपुष्पपत्रे व मोहोर ह्यांमध्ये असतो. ज्या प्रकारची मांडणी पानांत असते, तशीच मांडणी उपपुष्पपत्रामध्येंही असते. विशिष्ट उपपुष्पपत्रामध्ये विशिष्ट मांडणी असते, व त्याप्रमाणे मोहोराची मांडणी विशिष्ट प्रकारची होते. कारण मोहोर उपपुष्पपत्राच्या रचनेवर अवलंबून आहे.