पान:वनस्पतिविचार.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०



सर्व प्रकार होतात ! मधमाशांनी आपल्या स्वतःच्या उपयोगाकरितां तयार करून ठेवलेला मध देखील आम्ही असाच खातो. पंचामृतपूजेमधील पयस्नान, घृतस्नान, दधिस्नान व मधुस्नान ही या प्राणिजन्य पदार्थांच्या वर्गात येतात, आणि शर्करास्नान मात्र वनस्पतिजन्य पदार्थांच्या वर्गात जाते. वनस्पतिरूप प्राण्यांबद्ल तर बोलावयासच नको. कारण आम्ही बोलूनचालून वनस्पत्याहारी.. सोले (हरभऱ्याचे कोवळे दाणे ) वरणे, वाटाणे, तूर, मूग, उडीद वगैरेच्या शेंगांतील दाणे म्हणजे कोंवळीं अंडी, आपण मोठ्या प्रेमाने आणि स्वच्छ अंतःकरणाने खातों, मटक्या, कुळीथ, वाटाणे, पावटे, वगैरे म्हणजे त्या त्या झाडांची पूर्ण वाढलेली अंडीं होत. यांची उसळ करून आम्ही ती जशीच्या तशी ( वरच्या करवंटीसह) फस्त करितों, कांहींच्या मुळ्या तर कांहींची खोडे, कांहींची पाने, तर काहींची फुले, असे अनेक भिन्नभिन्न भाग किसून, कांपून, चेंचून, पिळून, उकडून, शिजवून, तळून, भाजून वगैरे अनेक प्रकारांनी खातों; आणि जंगली माणूस कच्चे मांस खातो, त्यापमाणे ऊस, कांकडी, खरबूज, कलिंगडे, पेरू, फणस वगैरे पदार्थ अग्नीचा संस्कार न करतां खातों. असे केल्याशिवाय आम्हांस गत्यंतरच नाही. कारण केवळ निरिंद्रिय सृष्टीमधून मिळू शकणाऱ्या पाणी, मीठ वगैरेसारख्या पदार्थांवर प्राण धारण करितां येत नाही. यावरून 'अहिंसा परमोधर्मः' या तत्त्वाची अमलबजावणी शक्यच दिसत नाही. खरे म्हटल्यास हिंसा म्हणजे काय हेच स्पष्ट सांगणे कठीण. या महासागरांतील एका ठिकाणचे पाणी दुसऱ्या ठिकाणी गेले तर ते नाहींसें झालें अगर नाश पावले असे कसे म्हणावयाचें ? बालक आईचे दूध पिते किंवा गर्भावस्थेमध्ये धडधडीत आईच्या शरीरांतील उत्तम रक्त त्याच्या पोषणास जाते यावरून मातृहत्येचे पाप त्याच्या पदरांत कसे बांधत येणार ? व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास निव्वळ वनस्पत्याहारामध्ये देखील पुष्कळशी हिंसा होते, यांत कांहीं संशय नाहीं. हे जाणूनच गलितपणें भक्षण करून रहाण्याचा उपदेश करण्यांत आला आहे. या उपदेशांतील खरे तत्व असे की, कस्तुरीमृगास स्वतःला नको असलेली कस्तूरी त्याच्यापासुन घेण्यांत कोणत्याही प्रकारचा गौणपणा नाहीं. त्याप्रमाणेच झाडांना नको असलेला डिंक किंवा इतर तसेच पदार्थ अगर भाग खाण्यांत कांहीं दोष नाहीं. हा सिद्धांतदेखील जीवनशास्त्रदृष्टया अगदी निर्दोष नाही हे लक्षात ठेविले पाहिजे. तात्विकदृष्ट्या