पान:वनस्पतिविचार.pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


या टोकास जसा 'अनादि' शब्द त्याप्रमाणे त्या टोकास * अनंत' हा शब्द जोडण्यांत येतो.

 इतके हे सर्व सूक्ष्म व क्लिष्टं भेदाभेद बाजूस ठेवून केवळ झाडझुडपांकडेच आपण जर नजर फेंकिली, तर तेथे देखील शब्दयोजनाचातुर्य जितक्यास तितकेंच दिसते. झाडांना प्राण असल्याचें पदोपदी हरतऱ्हेनें कबूल करावयाचे, परंतु त्यांना प्राणिमात्र म्हणावयाचें नाहीं ! अर्थावरूनच केवळ पहाता सिंहव्याघ्रादिकांना वनस्पति कां म्हणू नये आणि झाडाझुडपांना प्राणी कां म्हणू नये, याचे उत्तर देतां येण्यासारखे नाही. काही प्राणी अंडी घालतात, त्याप्रमाणे झाडेदेखील घालतात. प्राण्यांमध्ये त्यांना अंडी म्हणतात, तर इकडे झाडांमध्ये त्यांना बिया म्हणतात इतकाच काय तो फरक. कोंबडीचे अंडे, योग्यकालपर्यंत उबविलें गेलें म्हणजे पुढे त्यांतून पिल्लू बाहेर येते, त्याप्रमाणेच बीजाला उष्णता, ओलावा, हवा वगैरे अवश्य तितकी साधनसामुग्री मिळाली म्हणजे त्यांतून अंकुर बाहेर येतो व पुढे योग्य काली त्या बीजास जनक वृक्षाचे रूप प्राप्त होते. प्राण्यांप्रमाणे झाडांसदेखील बाल्य, तारुण्य, वार्धक्य या स्थिती आहेत; व ती देखील वाढतात, खातात, पितात, वळतात, सुकतात व मरतात. इतके सर्व कबूल असून देखील त्यांना प्राणी असे न म्हणण्याचा इतका हट्ट कां हें कांहीं कळत नाही. या प्राण्यांवर ( झाडांवर ) ताव मारणारे आणि त्या प्राण्यांवर ताव मारणारांची कुचेष्टा करणारे अशा कोणी, हा नामकरणामध्ये बुद्धिपुरस्सर पक्तिप्रपंच केला असल्यास कोणास माहित ? विलायतेतील वनस्पत्याहारामध्ये कोंबड्याच्या अंड्यांचा समावेश होतो, म्हणून हसणाऱ्या मंडळीनी इकडच्या आपल्या वनस्पत्याहारांत प्राण्यांपासून मिळणारे दूध व तज्जन्य दही, ताक, लोणी, तूप यांचा समावेश होतो हे विसरून कसे चालेल ? वास्तविक पहातां गाय असो, म्हैस असो, अगर शेळीं असो, तिच्या आचळांतील दूध (हें वासरू, रेडकू, कोंकरुं, करडू , हवे ते त्याला म्हणा ) तिच्या पोरांकरितां ईश्वराने निर्मिलेले असते. परंतु आपण ते निःशंकपणे काढून घेतो आणि त्याच्या ऐवजी म्हशीच्या रेडकांस पीठ चारतो आणि ताक पाजतों ! दूध म्हणजे खरोखर एक प्रकारचे रक्तच होय. परंतु आम्हा वनस्पत्याहाऱ्यांची या दुधावर भारी भिस्त आहे. नुसते दूध पिऊन निराहार, उपोषणे, उपवास वगैरे