पान:वनस्पतिविचार.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

विचार करीत गेल्यास शेवटी ' हिंसा केली' की 'मुक्ति दिली' असा प्रश्न भारदस्तपणे अखेरीस विचारावयास सवड राहते आणि मृताच्या अगर मारणाराच्या इच्छेची, बुद्धिमत्तेची व ज्ञानाची मीमांसा साफ सोडून देऊन ' कर्ता करविता तो ( ईश्वर ) आहे' असे म्हणून आपले पूर्ण अज्ञान आणि तज्जन्य मनांतील गोंधळ मनुष्य प्रांजलपणे कबूल करितो. पाणी आणि मीठ हे मात्र दोन, पदार्थ असे आहेत की, त्यांच्या अस्तित्वास जीव हा साक्षात अगर परंपरेनें कारणीभूत नसतो, आणि त्या अर्थी पाणी प्याल्यास अगर मीठ खाल्यास हिंसा होते की नाही, हा मुळीं प्रश्नच निघत नाहीं. शरीरामध्ये थोडाबहुत लोह असतो तोही पदार्थ याच प्रकारचा आणखी कांहीं थोडे असे पदार्थ असतात खरे, परंतु त्यांच्यावर प्राण धारण होत नाहीं असा अनुभव आहे.

 एकंदरींत सारांश असा की, प्राण्यांपैकी काहींना सांकेतिक अगर पारिभाषिक या नात्याने वनस्पति हो शब्द लावण्यास येतो. अशा या वनस्पतींमधील आणि प्राण्यांमधील भेद खुलासेवार सांगणे कित्येकदां अगदी अशक्य होते. हा भेद सांगण्याच्या प्रयत्नाची पुष्कळ शिकस्त झाली आहे, तथापि आजमितीस असे पुष्कळ सजीव पदार्थ आहेत की, ज्यांना धड प्राणीही म्हणतां येत नाहीं आणि वनस्पतीही म्हणता येत नाही. या वर्गाला झूफाईटस ( Zoophytes ) असे नाव दिले आहे. या नांवाचा अर्थ प्राणिरूप वनस्पति अगर ' वनस्पतिरूप प्राणी ' असा होतो. हा शब्दप्रयोग दगडफूल, अबदुलभट, सीतारामखान, आब्राहामाप्पा हा अशा प्रकारचा आहे, आणि यावरून वनस्पति आणि प्राणी यांच्यामधील भेद सांगणे नेहमी शक्य नसते, हे उघड सिद्ध होते. एकंदरींत खरे सजीव कोण आणि खरे निर्जीव कोण, याचा विचार येथे कर्तव्य नाही. तसेच वनस्पति आणि प्राणि यांच्यामधील खरा भेद कोणता तेही पहावयाचें नाहीं, या अखिल वस्तुजातापैकी कांहीं- की ज्यांना पारिभाषिक अगर सांकेतिक नांव वनस्पति हें दिले आहे, आणि ज्यांच्यापैकी पुष्कळांचा बोध व्यवहारामध्ये झाड या शब्दाने होतो, अशा-वस्तूंबद्दलची कांहीं माहिती येथे देण्यात येत आहे. वनस्पतिविचार म्हणजे वनस्पतीचे विचार नव्हेत, वनस्पतींमध्ये मज्जातंतुजाल आहे की नाही, याबद्ल बरीच शंका आहे. इष्ट वस्तूचे विचारपूर्वक सेवन आणि अनिष्टाचा बुद्धिपुरस्सर त्याग हें