पान:वनस्पतिविचार.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६७
-----

मूग, उडीद, वाटाणे, भुयमूग, हरभरे, वगैरेमध्ये आढळते. जेव्हां अण्डाशय बहुदली असून प्रत्येक दल सुटे अगर मोकळे असेल, तर एकदली अण्डाशयाप्रमाणेच नाळेची व्यवस्था आढळते; पण जेव्हां तो बहुदली तसेंच संयुक्त असतो, त्यावेळेस मात्र नाळेची व्यवस्था वेगळी असते. लिंबू, संत्रा, धोत्रा, कापूस, भेंडी, वगैरेमध्ये तो संयुक्त व बहुदली आहे.

 दलाचे दोन्ही पडदे मध्यभागी जमत जाऊन त्यांचा एक कण बनून त्यासच बीजे चिकटलेली आढळतात. म्हणजे येथे नाळेची व्यवस्था जणु चक्रांतील कण्याप्रमाणे असून त्यापासून बीजे उत्पन्न होतात. जेव्हां संयुक्त अण्डाशय बहुदली असून फक्त त्याचा एक खण असतो, अशा वेळेस बीजें किना-याकडेच आढळतात, व नाळेचा भाग मध्यभागापर्यंत न पोहोंचतां बाहेर बाहेर असतो. अशा प्रकारची उदाहणे पेरू, मटलाई, काकडी, भोपळा, मोहरी, शिरस, मुळे, वगैरे आहेत. काही वेळां फळ वाढू लागले असतां नाळ मऊ होऊन बीजे त्यापासून वेगळी होतात. अगर नाळेतील पेशी मांसल होऊन फळाचा गीर बनतो. पेरूमध्यें नाळेचा गीर होऊन बीजे सर्व फळभर पसरून जातात. टोमॅटो, वांगी, वगैरे मध्ये हीच स्थित आढळते.

 चंदन, पपया, पिंक वगैरेमध्यें अण्डाशय वाढू लागला म्हणजे दलाचे मध्य पडदे अगर दांते गळून, बीजाण्डे अगर बीजें मध्यभागी सुटी व मोकळी होतात. त्यांचा संबंध कोणत्याही प्रकारे दलाशीं न राहता केवळ पुष्पधारावरच ती अवलंबून असतात. पुष्कळ शास्त्रज्ञांची ह्याविषयी भिन्न भिन्न मते आहेत. कोणी म्हणतात की, प्रथम बीजाण्डाचा दलाशी संबंध असुन पुढे तो संबंध आपोआप गळून जातो. व ती मध्यभागी मोकळी होतात. कोणी म्हणतात की, प्रथमपासूनच त्यांचा संबंध स्त्रीकेसरदलांशी नसून पुष्पाधारापासूनच अण्डाशयात ती उत्पन्न होतात, अशा ठिकाणी पुष्पाधारच नाळेचे काम देत असतो, अथवा नाळ बनतो, असे म्हटले असतां चालेल. कोणत्याही मताप्रमाणे मध्यभागी सुटीं अण्डे असतात, ही गोष्ट खरी; मग त्यांचा उगम कसाही असो. कधी कधी बीजे अव्यवस्थितपणे बहुतेक सर्व अण्डाशयभर पसरतात. कमळामध्यें बीजे अण्डाशय=पडद्यासच चिकटली असतात. कधी कधी दलांच्या पाठीकडील भागी बीजे येतात, म्हणजे पाठीकडील भागी नाळ असते. खरोखर अशी उदाहरणे अपवाददर्शक आहेत.