पान:वनस्पतिविचार.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

परागवाहिनी ( style ) जाड अथवा बारीक, लांब अगर आंखूड, केसाळ अथवा केंसविरहित असते. गर्भधारणापूर्ण झाल्यावर ती गळून जाते, पण फळावर तिचे चिह्न नेहमी राहते. तिजवरील केस परागकण गोळा करण्यास उपयोगी पडतात. झेंडूच्या फुलांत ती प्रथम आखूड असून तिच्या सभोंवतीं पुंकेसरदलांच्या परागपीटिकेची नळी बनते. पण पुढे ती वाढत वाढत त्या नळीतून बाहेर पडते. बाहेर पडतांना तिजवरील केंसपीटिकेंतील परागकण चिकटून राहतात, व पुढे त्यांचा गर्भधारणेस उपयोग होतो. कधी कधी ही अण्डाशयाचे टोकापासुन न वाढतां बाजूकडून वाढते. त्या वेळेस तिचा उगम जणू पुष्पाधारापासून झाला आहे की काय, असे वाटण्याचा संभव आहे. जसे, सब्जा, कर्पूरी, तुळस, भोंकर, वगैरे.

 परागवाहिनीपेक्षां तिचे अग्र महत्त्वाचे असते. त्याचा आकार परागकण बरोबर पकडले जाऊन व्यवस्थितपणे अति नेण्यास योग्य असतो. पेल्यासारखा, केसाच्या पुंजक्यासारखा, केसाळ टोपीसारखा, साध्या टोपीसारखा, वगैरे आकार अग्रास येतात. ही अग्राची बाजू चिकट असते. त्यामुळे परागकण पडले म्हणजे वाऱ्याने उडून न जातां त्यावर घट्ट चिकटून बसतात. केसांचाही याच प्रकारचा उपयोग असतो. एकदां केसांत कण अडकले असतां सहसा सुटून जाणे शक्य नसते. काही ठिकाणी लांब परागवाहिनी नसून केवळ हे अग्रच असते. परागवाहिनीची फारशी आवश्यकता आहे असे नाहीं. परागवाहिनी म्हणजे अण्डाशयांत सरळ जाण्याचा परागणकणांचा रस्ता होय. अण्डाशयावर हे स्त्रीकेसराग्र (Stigma) मात्र असले पाहिजे. ते जर नसेल तर मात्र परागकण पकडतां येणार नाहीत; व परागकणांचा उपयोग न होतां वृथा ते गळून वायां जातील, हा परागकण पकडण्याचा सांपळा प्रत्येक अण्डाशयांवर असतो. सांपळ्याशिवाय परागकण आंत शिरणार नाहीत, व परागकणांशिवाय बीजाण्डाचे बीज तयार होणे अशक्य आहे.

 बहुदलधान्यवनस्पतीत मात्र अण्डाशय चोहों बाजूंनी आच्छादित नसून बीजाण्डे त्या दलावर उघडी असतात. अशा ठिकाणी वाऱ्याने परागकण तेथे पोहोचून त्याचा उपयोग होतो. असल्या फुलांत परगवाहिनी अथवा परागकण पकडण्याकरितां जरूर लागणारा सांपळा असत नाही. पण तो उघडा असल्यामुळे पराग आंत येऊ शकतात.