पान:वनस्पतिविचार.pdf/194

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

ओव्याचे फुलांत स्त्रीकेसरदलें दोन असून पुढे अण्डाशयांत चार खण उत्पन्न होतात. प्रत्येक दलांत मध्यभागी पडदा येऊन, प्रत्येकाचे दोन विभाग होतात. आतां ही गोष्ट खरी कीं, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ वाढत असतांना पुष्कळ फरक होत असतात, व त्या घडामोडींत दलांत कमी-अधिक खण अगर कप्पे तयार होतात. कित्येकवेळां प्रथम जरी ज्यास्त दले असली, तरी फळामध्ये तितकीच दलें आढळतील असे नाही. जसे-गहूं, झेंडू, वगैरे. म्हणूनच प्रथम

अण्डाशयांत ज्या गोष्टी आढळतात, त्या पुढे कायम राहतात असे नाही.

 अण्डाशय बहुतकरून पुष्पाधारांवर असतो. त्याचा संयोग पुष्पकोशाशी झाला असता त्यास अधःस्थ म्हणतात. तसेच ते मोकळा व सुटा असला तर त्यास उच्चस्थ म्हणतात, हे मागे सांगितलेच आहे. पाकळ्या अगर पुंकेसरदले ह्यांस पानासारखे कधी कधीं देठ असतात. विशेषे करून अण्डाशयास कधी त्या प्रकारचे देठ आढळत नाहीत; पण ह्या गोष्टीसही अपवाद आहेत. जसे-तिळवण वगैरे. पुष्पाधाराचीच अधिक वाढ होऊन अण्डाशयास देंठ उत्पन्न होतो.

 सुट्या स्त्रीकेसरदलांची संख्या सहज मोजता येते, पण संयुक्त अण्डाशयांत दलें किती आहेत, हे सहज कळत नाही. शिवाय फळ पूर्ण वाढले असतां निरनिराळे खण उत्पन्न झाल्यामुळे केवळ खणांवरून त्यांची संख्या ठरविणे योग्य होणार नाही. परागवाहिन्या अगर त्यांचीं अग्रें ह्यांवरून दलांची संख्या समजणे सुलभ असते. कारण तीं म्हणजे दलांची वाढती टोकें होत. म्हणून जितकी त्यांची संख्या असते, तितका दले असतात. जेव्हां परागवाहिनी संयुक्त असते त्यावेळेस त्यांची अग्रे मोजून दलांची संख्या मोजितां येते.

 अण्डाशयांत ज्या भागास बीजाण्डे चिकटली असतात, त्या भागात नाळ असे म्हणतात. एकदली तसेच बहुदली अण्डाशयांत नाळेची मांडणी वेगवेगळ्या प्रकारची असते. एकदली अण्डाशयांत नाळ बाजूकडे असते. त्यातच बीजें चिकटली असतात. पावट्याची शेंग सोलून पोटाकडील भागाकडे असणारी नाळ तसेच त्यापासून उत्पन्न झालेली बीजे पहावीत, येथे स्त्रीकेसर दलाचे दोन्ही किनारे एकेजागी चिकटून त्यापासून दोरीप्रमाणे जाड भाग बनतो, व त्या जाड भागास नाळ अशी संज्ञा असते. गर्भ वाढत असतांना गर्भास लागणारा पौष्टिक अन्नाचा ओघ नाळेतूनच जात असतो. किनाऱ्याकडे असणारी नाळ