पान:वनस्पतिविचार.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तेव्हां येथे एवढे सांगणे बस्स आहे की, वरील जासबंदी अगर त्या जातीच्या फुलांत जे उपपुष्पवर्तुळ ( Epicalyx ) असते, ते फुलांपैकी नसून त्याचा उगम व संबंध निराळा असतो.

 ज्याप्रमाणे पाने कमी अधिक दिवस खोडावर टिकतात, त्याप्रमाणे फुलांमध्येही दलें कांही दिवस टिकतात. नेहमींचा अनुभव असा आहे की, पराग कणांचा मिलाफ आंतील बीजाण्डाशी (Ovules ) झाल्यावर आपोआप अण्डाशय वाढू लागतो. दोन्हींचा मिलाफ होणे म्हणजे गर्भधारणा होय. गर्भधारणा झाल्याबरोबर ह्या बाह्यसंरक्षक वर्तुळांचा कांहीं उपयोग नसून ती दोन्हीं वर्तुलदलें म्हणजे सांकळ्या तसेच पाकळ्या हळु हळु कोमेजून गळून जातात. गर्भधारणा होईपर्यंत आंतील नाजुक अवयवांचे संरक्षण करणे हें मुख्य काम हीं बाह्यवर्तुळे करीत असतात. हे काम पूर्ण झाल्यावर ह्यांची जरूरी नसून ती आपण होऊन जाण्याचे मार्गास लागतात. पैकी पांकळ्या तर नेहमीच गळून जातात, पण काही ठिकाणी सांकळ्या अण्डाशयांवर चिकटून राहतात, जसे, दोडके, घोसाळी, वांगी, टोमॅटो वगैरे. लवंग, तंबाखू पेरू, डाळिंब वगैरेमध्ये ही दले, फळ तयार झाले तरी कायम राहतात. पण तेच पिवळा धोत्रा, अफू वगैरे फुलांत, फुले उमलण्याचा अवकाश, कीं ही लागलीच गळून जातात. कांही ठिकाणी ही दलें अधिक वाढून फळाभोंवती त्यांची गुंडाळी होते. जसे कपाळफोडी, रसबेरी वगैरे. नास्पाति अगर सफरचंद फळांत ह्या दलांचा मांसल भाग फळाबरोबर वाढून तो फळांत समाविष्ट होतो.

 द्वितीय वर्तुळ-( Corolla) ह्या वर्तुळाचे प्रत्येक दलास पाकळी असे म्हणतात. हे वर्तुळ पुष्पकोश ( Calyx ) व पूं-कोश ( Androecium ) ह्यामध्ये असते. सांकळयापासून पाकळ्या त्यांच्या नाजुक स्वभावामुळे तसेच निरनिराळ्या रंगीतपणामुळे सहज ओळखितां येतात. विशेषेकरून हिरवा रंग पाकळ्यांत कमी असतो. जसे हिरवा गुलाब, अशोक वगैरे. कांहीं फुलांत पांकळ्यांचा रंग मनोवेधक व चित्ताकर्षक असतो. पाकळ्या चित्ताकर्षक असल्यामुळे फुलपांखरे वगैरे क्षुद्र किडे त्या रंगास भुलुन त्यावर झडप घालितात. केवळस्रीकेसर ( Pistillate ) फुलांत असले मनोहर रंग अधिक