पान:वनस्पतिविचार.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८ वे ].   पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla).   १५५
-----

आकार पाकळ्यांच्या संयोगामुळे उत्पन्न होतात, व त्याठिकाणी ते अधिक स्पष्ट असतात. अण्डाशयाचे वर अगर खाली हें वर्तुळ जसे असेल त्याप्रमाणे उच्चस्थ Superior अगर अधःस्थ Inferior हीं नांवे देतात. जेव्हां पुष्पकोशाचा कोणताही संबंध अण्डाशयांशी असत नाहीं, व अण्डाशय केवळ मोकळा असून पुष्पाधारांवरच असतो, अशावेळी अण्डाशय उच्चस्थ असे समजतात. अशा ठिकाणीं तो उच्चस्थानी असो अगर नसो, तो विशेष मुद्दा नाहीं. पण मोकळा अगर सुटा आहे किंवा नाही हे पाहणे जरूरीचे असते. तसेच हा कोश जेव्हां त्यांशी संलग्न असतो, मग त्याचे स्थान उच्च असो अगर खालीं असो, तथापि त्यास अधःस्थ Inferior म्हणतात. म्हणून जेव्हां अण्डाशय उच्चस्थ Superior तेव्हां पुष्पकोश अधःस्थ; व उलट जेव्हां तो अधःस्थ तेव्हां पुष्पकोश उच्चस्थ असा नियम आहे.

 तरवार, आर्किड वगैरेमध्यें हें वर्तुळ पाकळ्यांच्या रंगाचे असते. गुलाबांत हिरवे असते असे वर सांगितलंच आहे. ते सूर्यकमळांत तांतेसारखे असतं, झिनिया, कॉसमास, झेंडू वगैरेमध्ये हे वर्तुळ बहुतेक असत नाहीं; व त्याजागी केसाचे दोन पुंजके असतात. गहूं, बाजरी, ज्वारी, जव, जाई, वगैरे फुलांमध्ये हे वर्तुळ अशाच प्रकारचे असते. येथे केंसाऐवजी चामड्यासारखे चिंवट पुष्पावरण असून त्यासच हें वर्तुळ समजतात. त्या आवरणाचे आंत पुंकेसर अथवा स्त्रीकेंसरदले असतात. अशा फुलांमध्ये पुष्पमुगुटाचा ( Corolla ) अभाव असतो. अथवा दोन केंसाच्या उशीसारखे जे आवरणांत भाग आढळतात, त्यासच पुष्पमुगुट असे समजतात. जासवंदीचे फुलांत पहिल्या वर्तुळाचे खालील बाजूस त्याच प्रकारचे हरित उपवर्तुळ ( Epicalyx ) असते. ह्या वर्तुळाचा फुलांतील वर्तुळांत समावेश होत नाही. हे वर्तुळ उपपुष्पपत्राचे ( Bracts ) बनले असते. उपपुष्पपत्रे म्हणजे पानासारखे भाग असून त्यांचे पोटांतून फुलांची दांडी अथवा देंठ निघतो. कळ्यांचा व पानांचा जो संबंध असतो, तोच संबंध उपपुष्पपत्रे ( Bracts ) व फुले यांचा असतो. उपपुष्पपत्रे ( Bracts ) पुष्कळ ठिकाणी निरनिराळ्या आकाराची, व तऱ्हेतऱ्हेच्या रंगाची असून कमी अधिक दिवस फुलांवर टिकतात. ह्यांचे सर्व प्रकार व निरनिराळ्या जाती फुलांच्या दांडीवरील मांडणीमध्ये वर्णन करणार आहोत.