पान:वनस्पतिविचार.pdf/178

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

इत्यादिच्या फुलांत पुष्पकोशाचे भाग कमी अधिक वाढतात, त्यांत सारखेपणा अगदी नसतो. पुष्कळ वेळां वर्तुळाची जागा बदलली असते. हा जागेंतील फरक, दलें द्विगुणित झाल्यामुळे होतो अथवा कांहीं दलांच्या अभावामुळे ही असाच फरक उत्पन्न होतो. पुष्कळ फुलांत दुसऱ्या व तिसऱ्या वर्तुळांत जागेसंबंधी घोटाळा असतो. असा घोटाळा उत्पन्न झाल्यामुळे दलें परस्पर एकमेकांसारखी होत जातात. जसे, जासवंद.

 वर्तुळाची दले सुटी असतात असे नाही. कधी कधी ती दलें परस्पर चिकटलेली असतात, अथवा त्या वर्तुळाचा संबंध दुसऱ्या वर्तुळाशी येतो. हा संयोग दोन प्रकारचा असतो. जेव्हा एकाच वर्तुळांतील सर्व दलें परस्पर संलग्न होतात, तेव्हां अशा संयोगास ' परस्परदलसंयोग' (Cohesion) म्हणतात. कापसांतील सांकळ्या तसेच पुंकेसर हीं, परस्पर चिकटलेली असतात. सांकळ्या एकमेकांस चिकटून त्यांचे वाटीसारखे वर्तुळ तयार होते. पुंकेसर परस्पर संयोग पावून त्यांची नळी स्त्रीकेसर-कोशा-भोंवती असते. मूग, वाटाणे वगैरे फुलांत सांकळया वरीलप्रमाणे परस्पर संयुक्त असतात. धोत्रा, वांगी, तंबाखू, मिरच्या, कानव्हालव्हुलस, भोंपळा, दोडका, सूर्यकमळ वगैरे फुलांत दुसऱ्या वर्तुळांतील दले ऊर्फ पांकळ्या परस्पर-संयुक्त असतात. लिंब, संत्रं, जासवंद. वगैरे फुलांत पुंकेसर परस्पर चिकटलेले असतात. कांदे, लसुण, नाकदवणा, कापूस, धोत्रा, नारिंग वगैरे फुलांत स्त्रीकेसरदलें एकमेकांस लागून अण्डाशय संयुक्त झाला असतो; अथवा पुष्कळ अण्डाशय एकमेकांस चिकटलेले असतात. अशा ठिकाणी ‘संयुक्त' हा शब्द दलापूर्वी योजून त्यांचा संयोग (Cohesion ) दर्शविला जातो. जसे संयुक्त पाकळ्या, संयुक्त पुं अथवा स्त्रीकेसर वगैरे वगैरे. संयुक्त शब्दाचे उलट वियुक्त शब्द सुट्या दलापूर्वी योजतात. जसे, वियुक्त अथवा सुट्या पाकळ्यां. उदाहरण, कापूस, सुटे पुंकेसर, जसे गुलाब, सुटी स्त्रीकेसरदले जसे हरिणखुरी,सुई, हिरवाचाफा वगैरे.

 जेव्हां ऐका वर्तुळाचा दुसऱ्या वर्तुळाशी संयोग अंसतो, त्यांस 'परस्पर-वर्तुळ-संयोग ' ( Adhesion ) असे म्हणतात. धोत्र्याचे फुलांत पुंकेसरकोश द्वितीय वर्तुळाशीं संयुक्त असतो. साधारण पहिली तिन्ही वर्तुळे चवथ्या वर्तुळाखाली असून चवथ्या वर्तुळाचा अथवा अण्डाशयाचा वरील तिन्हीं वर्तुळाशी कांहीही संबंध नसतो. अशा वेळी अण्डाशयास ‘ उच्चस्थ'