पान:वनस्पतिविचार.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४९
-----

पुंकेसरांची संख्या अधिक होते. जासवंदी, कापूस, लोकॅट, स्ट्राबेरी वगैरेमध्ये पुंकेसरांची संख्या अधिक असते. एकदल वनस्पतीमध्ये फुलांची वर्तुळे त्रिदळी असतात, असा साधारण नियम आहे. पण पुष्कळ वेळां पुंकेसराची दोन वर्तुळे होऊन प्रत्येकांत तीन तीन दले आढळतात. जसे, घायपात, नाकदवणा वगैरे. पिवळा कण्हेर, कृष्णकमळ, रुई. मांदार वगैरे फुलांत पांकळ्यासारसे भाग एकवटून त्यांचे एक निराळे वर्तुळ बनते. सोनचाफ्यामध्ये पहिली दोन्ही वर्तुळे पिवळी असून दलांची संख्या दहांपेक्षा अधिक असते. मोहरीचे पुंकेसर सहा असून पैकी चार लांब व दोन आखूड असतात. दोन पांकळ्यांचे समोर लांब पुंकेसरांची एक जोडी असून, उरलेल्या दोन पाकळ्यांसमोर एक एक लहान केसर असतो. प्रत्येक पाकळ्या समोरासमोर पुंकेसर असल्यामुळे द्विगुणित भाव होतो. साधारण नियम असा आहे की, वर्तुळाची दुले दुसऱ्या वर्तुळाच्या समोर न येतां एक झाल्यावर एक येत जातात; म्हणन समोरासमोर प्रत्येक वर्तुळाची दले झाली असतां द्विगुणित भाव आहे, असे समजण्यास हरकत नाही.

 वर सांगितलेच आहे की, वर्तुळाचे स्वभावामुळे केवळ पुंकेसर फुलें अथवा केवल स्त्रीकेसर फुले उत्पन्न होतात. पुष्कळ वेळां वर्तुळांतील कांहीं दलें नाहीशी होतात. जसे मोहरींत सहाच पुंकेसरदले असतात. वास्तविक आठ असली पाहिजेत. शिवाय स्त्रीकेसरदलें दोनच असतात. जवसासारखी फुले सार्वत्रिक थोडीच आढळतात. कापसाच्या फुलांत स्त्रीकेसर दलें तीन असतात. बाकीचीं दळे पांच पांच असतात. पुंकेसरदले मात्र पुष्कळ असून ती सर्व एकमेकांस चिकटून त्यांची जणू एक नळी स्त्रीकेसरदलासभोंवती असते. मुळ्याचे फुलांत स्त्री-केसरदले भाग दोन असून पहिली वर्तुळे चार दलांची असतात. झेंडूच्या फुलांत पहिले वर्तुळ बहुतेक नाहीसे असते; अथवा त्या जागी दोन केसासारखे भाग असतात. दुसऱ्या व तिसऱ्या वर्तुळांत प्रत्येकी पांच दले असतात. पण चवथ्या वर्तुळांत दोनच दले असतात. कधी कधी पुंकेसरापासून पाकळ्या बनत असतात. जसे, कर्दळी, गुलाब, जास्वंद वगैरे. जासवंदीमध्ये पुंकेसर अर्धवट पांकळ्याप्रमाणे होऊन त्यावर कधी कधी परागपिटिकाही असते. परागपिटिका पाहून पूर्ण खात्री होते की, ती पांकळी नसून पुंकेसरापासून पाकळी बनत आहे. धने, बडीशोप, ओवा, शोपा,