पान:वनस्पतिविचार.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३ वे ].    क्षार, कार्बन् वायू व हरितवर्ण शरीरें.    १०७
-----



आगमन होते. तसेच पानांतून फाजील पाण्याची वाफ होऊन हवेत ती कशी मिसळते व त्या योगाने पुनः नवीन पाणी कसे जोराने चढते, ह्याचा विचार पूर्वी झाला आहे. आतां पौष्टिक वायु वनस्पतिशरीरांत कसे शिरतात व पुढे त्यांपासून कोणती कार्ये घडतात, वगैरे गोष्टींचा विचार अजून व्हावयाचा आहे. खरोखर पाणी व अन्नशोषण जितके कठीण व त्रासदायक असते, तितकें वायुशोषण कठीण नाहीं.

 वनस्पतीची महत्त्वाची पौष्टिक आम्ले म्हणजे कार्बन व नायट्रिक आम्लें होत. पानांतील हिरवळ पेशीजालांत कार्बन वायूपासून आम्ल झाल्याशिवाय तो तो वायु वनस्पतीस निरुपयोगी असतो. त्याकरितां पानांत पाण्याचा एक थर अलग असतो. बाह्यत्वचेखाली आंतील अंगास हा थर असतो. हरित्वर्ण शरीरांकडून हवेतून कार्बन वायूचे शोषण होते. कार्बन वायु त्वचारंध्रातून आंत शिरल्यानंतर पाण्याचे थराशी मिळून त्यापासून कार्बन आम्ल तयार होते. हे आम्ल पुढे हरितवर्ण पेशीजालाकडे जाऊन मुळांतून शोषिलेलें प्राणी व निरिंद्रिय पदार्थ, यांशी रासायनिक संयोग होऊन त्यापासून इच्छित ऐंद्रिय पदार्थ तयार होतात. हरितवर्ण शरीराकडून ह्या कार्बन् आम्लाचे विघटीकरण सूर्यप्रकाशांत होते, व विघटीकरण स्थितीत रासायनिक संयोग पावून ऐंद्रिय वस्तु तयार होतात. म्हणूनच ऐंद्रिय पदार्थ बनविण्यास सुर्य प्रकाशाची अत्यंत जरूरी असते. गर्द छायेमध्ये अथवा अंधारांत हरित्वर्ण शरीराकडून कार्बन वायु आकर्षिला जात नाहीं, अथवा त्याचे विघटीकरणही होत नाही. म्हणून ही दोन्ही कार्ये होण्यास सूर्यप्रकाश हवा असतो. बाष्पीभवनास जशी सूर्यप्रकाशाची जरूरी असते, तद्वतच कार्बन वायूचे शोषण अथवा विघटीकरण यास प्रकाशाची जरूरी असते. म्हणून ऐंद्रिय पदार्थ बनणे तसेच बाष्पीभवन होणे, ही दोन्ही कार्ये दिवसाउजेडी घडत असतात. शिवाय बाष्पीभवनापासून जितकें अधिक निरिंद्रिय द्रव्यमिश्रित पाणी हृरितपेशीजालांत येईल, तितक्या अधिक प्रमाणांत त्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार होतील. सेंद्रिय पदार्थ खरोखर वनस्पतींची खाद्ये आहेत. खाद्ये तयार करण्याचे काम दिवसा प्रकाशात चालत असते. रात्रीच्या वेळी बाष्पीभवन तसेच सेंद्रिय पदार्थ बनणे ही दोन्हीं कार्य बंद असतात.