पान:वनस्पतिविचार.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९७
-----

बाष्पीभवन कमी असते, म्हणजे एकंदरींत ह्या दोन्ही क्रिया परस्पर विरोध वेळेत चालतात, असे म्हटलें असतां चालेल.

 मुळाच्या शोषक क्रियेस ऑक्सिजन वायूचीही जरूरी असते. जेव्हा मुळ्यांस पूर्ण स्वच्छ हवा मिळत असते, अशावेळेस त्यांची शोषकं, क्रिया जोराने चालू राहते, पण स्वच्छ हवेच्या अभावी ती क्रिया मंद होते. म्हणूनच शेतकरी जमीन नांगरून पूर्ण रंध्रमय करून टाकतो. त्यामुळे जमिनीत घुसणाच्या मुळ्यांस त्या रंध्रांतून स्वच्छ हवा मिळून तीं आपलें अन्न शोषण करण्याचे काम उत्तम करितात.

 जमिनीतील क्षारांच्या प्रमाणावरही मुळाची शोषकक्रिया अवलंबून असते. जसे जमिनीत मीठ पुष्कळ असले तर तेथील पाणी बहुतेक खारट असून मुळांत शिरण्या ऐवजी मुळांतील पाणी कधी कधी बाहेर जाऊ लागते.

 जेव्हां वनस्पति लहान व कोवळी असते, त्यावेळेस तीस जरूर लागणारे पाणी व इतर पौष्टिक पदार्थ थोड्या प्रमाणांत पुरतात; पण जसे जसे ती वनस्पति वाढू लागते, त्या प्रमाणांत तिच्या गरजा अधिक वाढत जातात. कोवळेपणी मुख्य मुळांवरील केंस अन्न शोषण करण्याचे काम करीत असतात, पण जेव्हां जून स्थिति येत जाते. त्यावेळेस केसांची जागा मोठी विस्तृत असण्याची जरूरी असते. म्हणूनच मुख्य मुळापासून पुष्कळ पोटफांद्याच्या अग्रा जवळ नवीन नवीन केस येतात. हे सर्व केंस आपले शोषणकाम करीत असल्यामळे वनस्पतींच्या वाढत्या गरजा भागतात. नाहीतर अन्नशोषण कमी होऊन अन्नाचा खर्च जेव्हां जास्त होऊ लागतो, त्यावेळेस झाडास ओढती लागली असे म्हणतात. ह्या ओढतीचा वनस्पतीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. प्रत्येक केंस आपल्या विशिष्ट जागेत शोषणाचे काम करीत असतो, व ह्या रीतीने जेव्हां सर्व केंस आपल्या कामांत गुंतले असतात, त्यावेळेस जमिनीची किती जागा त्याचे आकर्षण-अंमलाखाली येते, ह्याची कल्पना सहज करितां येणार आहे.

 जमिनीच्या खरखरीत कणांशीं केंसाचा संबंध असल्यामुळे ते लवकर झिजून शेषणाचे कामांस निरूपयोगी होतात; पण सजीवतत्त्व त्यांचे ऐवजी नवीन केंस उत्पन्न करण्याची सोय करून शोषण कामास अडथळा होऊ देत नाहीं.