पान:वनस्पतिविचार.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

ह्याच प्रकारची पाणी वर चढण्याची क्रिया असावी, असे अनुमान काढीत असत; पण हा कोटिक्रम अलीकडील शोधाअंती चुकीचा ठरत आहे. एक तर कांहीं वाहिन्यांची बुडाकडे तसेच अग्रांकडे तोंडे बंद असल्यामुळे अशा प्रकारची केशाकर्षक (Capillary) क्रिया त्यांमध्ये सुरू होणे अशक्य असते. तथापि जरी अशी क्रिया सुरू झाली अशी कल्पना केली तरी, त्यामुळे पाणी दूरवर चढणे शक्य नसते. फारतर थोड्या अंतरापर्यंत ह्या क्रियेने पाणी वर जाऊ शकेल. पण मुळाच्या क्षुद्रपेशीपासून खोडांत, तसेच खोडांतून पानांस अथवा निरनिराळ्या फांद्या व पोटफांद्यांतून शेंड्यापर्यंत पाणी वर चढणे ह्या रीतीने शक्य नसते. कारण आम्हांस शेंड्यावरील पानांतून सुद्धां पाणी गळलेले दृष्टीस पडते. शिवाय ही गोष्ट उघड आहे की, पुष्कळ झाडांत जेव्हां बाह्यत्वचेपासून बाष्पीभवनाचा जोर कमी असतो, अशा वेळेस, द्रवात्मक रस जोराने वर चढत असतो; म्हणजे बाष्पीभवनामुळे उत्पन्न होणारा अंतर जोर नसतांनासुद्धां ज्याअर्थी रस जोराने वर चढतो, त्याअर्थी दुसरी एखादी शक्ति अशी असली पाहिजे की, त्यामुळे हे रसाचे वर चढणे घडत असले पाहिजे, व ती दुसरी शक्ति म्हणजे ' मूल जनित शक्ति' ( Root pressure ) असे आतां सिद्ध झाले आहे.

 झाडांस पूर्ण पालवी फुटला नसतांना हिवाळ्याचे शेवटीं व वसंतऋतूचे सुरवातीस हे चमत्कार विशेष पाहण्यांत येतात. खरोखर हिंवाळ्यांत झाडांतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असते, शिवाय ज्यांतून बाष्पीभवन होते ती साधने म्हणजे झाडांची पाने ही त्यावेळेस पूर्ण नसतात. म्हणून अशा चमत्कारांत बाष्पीभवन अथवा बाष्पीभवनोत्पादित जोर ह्यांचा मुळीच संबंध नसतो. केवळ ऑसमॉसिसक्रियेने पेशींत पाणी शिरून मुळांच्या पेशी तणाणून त्यापासून उत्पन्न होणारा मुळांचा जोर (Root pressure ) असल्या चमत्कारास कारणीभूत असतो. मुळांच्या शोषकक्रिया सभोवतालच्या परिस्थिती वर अवलंबून असतात. विशेषेकरून हवेची तसेच जमिनीची उष्णता असली तर मुळाच्या जोराने बाहेर जाणारे पाणी अधिक जोराने वाहू लागते, व त्यामुळे वनस्पतीचे बरेच नुकसान होते. ज्यावेळेस बाष्पीभवन अधिकाधिक होऊ लागते, त्यावेळेस मृळांत उत्पन्न होणाऱ्या जोरामुळे घडणारे चमत्कार कमी होऊ लागतात. तसेच उलट जेव्हा हे चमत्कार अधिक होत असतात, त्यावेळेस