पान:वनस्पतिविचार.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९५
-----

अग्रांतून दंवासारखे बिंदू पानाच्या पृष्ठभागांवर चमकू लागतात. पानांतील पेशींत फाजील पाणी भरल्यामुळे कधी कधी बाह्यत्वचा फाटून बाहेर पाणी गळू लागते. उन्हाळ्यांत असले प्रकार फारसे आढळत नाहींत. पानांतून अशा रीतीने पाणी वाहणे म्हणजे खरोखर वनस्पतीचे एक प्रकारे नुकसान होते. कारण ह्या पाण्यात पुष्कळ उपयोगी पडणारी पौष्टिक द्रव्ये असतात. अशा पाण्याचे रसायनशास्त्र-पद्धतीने पृथक्करण केले असतां किती तोटा होतो, हे सहज कळणार आहे. ही निरिंद्रिय द्रव्ये अशा रीतीने बाहेर न जाती तर त्यांचा उपयोग वनस्पति-आयुष्यक्रमांत होऊन त्यांपासून पोषणकार्य घडले असते. तसेच त्याचा परिणाम वनस्पतीच्या आरोग्यावरही झाला असता.

 बाष्पीभवन होत नसतांना ह्या शक्तीचा जोर मोजितां येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीस पाने ही पूर्ण आली नसतां द्राक्षाचा खोड आडवा कापून टाकावा. ह्या कापिलेल्या भागांतून पाण्याचा प्रवाह बाहेर पडू लागेल. हा प्रवाह मूलजनितशक्ति-परंपरेने सारखा वाहत राहतो. द्राक्षाच्या खोडांतच हा चमत्कार दिसतो असे नाही. इतर पुष्कळ वनस्पतींमध्ये ह्या प्रकारचा चमत्कार दिसून येईल. लिंबाच्या खोडांतून कधी कधी अशाच प्रकारचा रस आपोआप गळत असतो. हा रस सुद्धां मूलजनित शक्तीचा एक प्रकार आहे.

 मुळांचा जोर इतका असेल व त्यापासून असे कार्य घडत असेल, असे जोंपर्यंत पूर्णपणे माहीत नव्हते, त्यावेळेस मुळावरील केसांत पाणी शिरणे तसेच ते पाणी वर चढणे ही कार्य केशाकर्षक (Capillary) असावीत, असा समज होता. तेलामध्ये वात बुडवून ठेविली असतां, आपोआप हळू हळू वातीच्या अग्नांकडे तेल येत जाते. हा नैसर्गिक चमत्कार नेहमी पाहण्यांत असतो. तद्वतच तो चमत्कार वनस्पतिमुळांत पाणी शिरण्यासंबंधी असावा, असा पूर्वीचा समज होता. सूक्ष्म मुळ्या अथवा मुळावरील केंस, ही जमिनीतील पाण्यात बुडाली असून, जसे तेल वातीतून वर चढते, त्याप्रमाणेच पाणी त्या केसांतून आपोआप वर चढते. तसेच पाण्याच्या कमी अधिक घनतेप्रमाणे पाणी वर चढत असावे असा नेहमी कोटिक्रम करण्यात येत असे. कारण जितकें तेल पातळ असते, तितके ते लवकर वातींत शिरून वर येते, तसेच जितकें तें घन व घट्ट असते, त्या मानाने ते सावकाश चढत जाते.