पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

म्हणजे गोमाशी मरते. मग ती युक्तीनें, बाहेर काढावी. एरंडमूळ व पळसमूळ तांदळाचे धुणांत उगाळून त्याचा लेप दिल्याने गंडमाळा बऱ्या होतात. अशा प्रकारचे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. आतां कडव्या म्हणजे मोगली एरंडाचे कांही उपयोग सांगून हा भाग पुरा करू. मोगली एरंड बहुतकरून कुंपणांत लावितात. याचे काष्ठ दंतधावनास घेतात. हे झाड जेपाळाच्याच वर्गातील आहे. याच्या बिया पोटात गेल्यास वांत्या व जुलाब होतात. यासाठी याचा उपयोग जपून करावा. या झाडाला चीक पुष्कळ असतो, हा चीक हातावर चोळल्याने साबणाप्रमाणे त्याचा फेस होतो. हा फेस साधारण घट्ट झाला म्हणजे चार पांच वेळ वृश्चिकदंशावर लावावा, तेणेकरून गुण येतो. या एरंडाचा चीक लोखंडी तव्यांत काढून त्यांत पारोसा थुंका घालून त्या मिश्रणात रसकापुराचा खडा उगाळून त्याचा लेप गमींचे चट्यावर केला असतां चार-दोन दिवसांतच गुण पडू लागतो. या एरंड्याच्या बियांचेही तेल निघते. सुरती एरंड्यांच्या बियांचेही तेल निघते. सुरती एरंड्यांचे थोड्या प्रमाणांत तेल काढण्याची जी रीति मागे दिली आहे, त्याच रीतीनें या एरंड्याचेही तेल निघते. या तेलाचा फुटलेल्या बदांची क्षते भरून येण्याला चांगला उपयोग होतो. महारोगावर व भगेंद्रादि दुर्धर व्रणांवरहीं या तेलाचा उपयोग करतात. महारोगी मनुष्याच्या अंगाला हे तेल दिवसांतून चार पांच वेळ जिरवावे. या तेलांत कापसाची वडी भिजवून ती भगेंद्रादि व्रणांवर बसवितात. तेणेकरून व्रण भरून येतो. गुरांना हरीक लागल्यास या एरंडाच्या पानांचा रस काढून जनावरांच्या शक्तीच्या मानाने दीड शेर पर्यंत दिला असतां एक प्रहरांत माज उतरतो. अशा प्रकारचे कांहीं आश्चर्यकारक गुण या निरुपयोगी वाटणाऱ्या मोगली एरंडामध्ये आहेत. या एरंडाची बी काळ्या कवचाची असते, ते कवच फोडून टाकतांच आंत हुबेहुब भुईमुगाच्या दाण्याप्रमाणे पांढरा दाणा निघतो. या दाण्यांत तेल असते, यामुळे मासे वगैरे मारणारे लोक या बिया काठीमध्ये टोचून त्यांच्या दिवट्या बनवितात व रात्रीच्या वेळीं चुडीऐवजी या दिवट्यांचा उपयोग विशेषतः करितात.

--------------------
३८ जवस.

 जवसाला गुजराथेत अळशी असे म्हणतात. अळशीचे झाड हात दीड हात उंच वाढते. हे झाड सुमारें करांगळीइतके जाड होते. या झाडाला लहान लांबट पाने येतात. ही पाने खोकला, कफ व वायु यांचा नाश करणारी आहेत, या झाडाला वाटोळे व अणकुचीदार बोंड येते व यांतच अळशीचे बी असते. त्यास जवस असे म्हणतात. जवसांचा रंग तपकिरी असून ते