पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      एरंड.      ५७

-----

बी असते. त्यास एरंड्या असे म्हणतात. एरंडीचा व्यापार हल्ली फारच वाढला आहे. सन १८९७|९८ साली हिंदुस्थानांतून ७६ लक्ष रुपयांची एरंडी व २६ लक्ष रुपयांचे एरंडेल परदेशांत गेले. ह्या वरील आंकड्यावरुन एरंडीचा व्यापार हल्ली किती वाढला आहे, याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. एरंडीच्या बियांचे तेल काढितात, त्यास एरंडेल असे म्हणतात. गुजराथेकडे या तेलास दिवेल असेही म्हणतात. तेल काढणे ते एरंड्या घाण्यांत घालुन काढतात; थोड्या एरंड्या असल्यास त्या वाटून पाण्यात घालून शिजवितात म्हणजे तेल वर येते, ते काढून काचेच्या भांड्यांत भरून ठेवतात. चार शेर एरंड्यांपासून सुमारे एक शेर तेल निघते. हे तेल औषधी असून जाळण्याचे कामही याचा चांगला उपयोग होतो. इतर सर्व तेलांपेक्षा हे तेल फारच थंड जळते. आणि ह्यापासून काजळही फार पडत नाही. हा या तेलाच्या अंगचा एक विशेष गुण आहे. मात्र हे तेल मातीच्या पात्रांत जाळावे लागते. धातूच्या पात्रात चांगलें जळत नाही. जुलाब होण्याकरिता एरंडेलाचा उपयोग करतात, हे सर्वांना विदितच आहे. कातडी कमाविण्यास या तेलाचा उपयोग होतो. मोरक्को लेदर याच तेलाने कमावितात. यंत्रांना व गाडीच्या चाकांना लावण्याला या तेलाचा उपयोग होतो, साबण व मेणबत्त्या करण्याकरिता अलीकडे या तेलाचा फार खप होऊ लागला आहे. आगगाडीच्या चाकांनाही याच तेलाचे वंगण करतात. एरंडीची पेंड खताच्या व जाळण्याच्या उपयोगी पडते. अलीकडे ग्यास तयार करण्याचे कामही या पेंडीचा उपयोग करू लागले आहेत. वृश्चिकदंशावर एरंडाचे पानांचा उपयोग करतात. एरंडाच्या पानांचा रस काढून तो शरिराच्या ज्या भागाला देश झाला असेल, त्याच्या विरुद्ध बाजूच्या कानांत घालावा. याप्रमाणे तीन वेळ कृति करावी. सर्पदंशावरही याचा उपयोग करतात. दंश होताच चार चमचे रसांत एक चमचा पाणी घालून ते पाजावे व पाला वाटून दंशावर लावावा वमन होऊन वीष उतरेल एरंडाची मुळे ही औषधी आहेत.

  एरंडमूलं द्विपलं जलेऽष्टगुणिते पचेत् ।।
  तत्क्वाथों यावशूकाढ्यः पार्श्वहृत्कफशूलहा ॥ १ ॥
      "शार्ङगधर "
 म्हणजे-एरंडमूळ आठ तोळे घेऊन त्यांत आठपट पाणी घालून त्याचा अष्टमांश काढ़ा करुन त्यांत जवखार घालून तो काढा सेवन केल्यास उदरामध्ये व पाठीमध्ये होणारा कफशूल बरा होतो. कानांत गोमाशी वगैरे गेल्यास जुनेदाट झालेले एरंडेल १।२ दिवस कानांत घालावे.