पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
शहापुराकडील रंगाची कृति.

 सुताची चोवीस चिवटे घेऊन त्यांतील तीन तीन चिवटे एकमेकांस जोडून त्यांची एक एक पेळ अशा आठ पेळा करतात. नंतर केळीच्या सोपाची राख पांच शेर घेऊन ती एका डोणीत टाकतात. त्यांत घागरभर पाणी ओतून ते चांगले ढवळून एक तास तसेंच राहूं देतात. म्हणजे सर्व राख तळीं बसून निवळ पाणी वर येते. त्यांतील सुमारे तीन शिसे पाणी एका मोठ्या पातेल्यांत घालून त्यांत पांच तोळे बकऱ्याच्या लेंड्या आणि सवाशेर तिळाचे तेल मिसळतात. नंतर या मिश्रणांत सुताची एकेक पेळ भिजवून न पिळतां एकावर एक अशा आठही पेळा रचून ठेवितात व त्यांस हवा वगैरे लागू नये म्हणून गोणपाटाच्या तुकड्यांनी चांगल्या आच्छादून दोन दिवसपर्यंत ठेवितात. तिसऱ्या दिवशी केळाच्या सोपाची राख घागरभर पाण्यांत वर सांगितल्याप्रमाणे मिसळून त्यांतील निवळ पाणी तीन शिसे एका डोणीत घालून त्यांत दोन दोन पेळा दरवेळी घालून तुडवितात आणि त्यांतील तेल घालवितात. नंतर पेळा काढून न पिळतां फरशीवर उन्हांत टाकतात. पेळा एकमेकांवर न ठेवता वेगवेगळ्या वाळवितात व त्या फार वेळ उन्हांत ठेवीत नाहीत. नाहीतर त्यांत अपोआप अग्नि उत्पन्न होतो असे म्हणतात. पेळा साधारण ओलसर असतां सावलीत नेऊन पसरून ठेवतात. नंतर पुन्हा उन्हांत चार तासपर्यंत वाळवितात. वाळल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे डोणीत पाणी घालून त्यांत केळीच्या सोपाची राख घालून ढवळतात व राख साली बसून निवळ पाणी वर आले म्हणजे त्यांत त्या पेळा बुडवून पूर्वीप्रमाणे सर्व कृति करितात. याप्रमाणे पांच सहा वेळ केल्यानंतर ते सूत ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन धुतात आणि फरशीवर वाळवितात. इतके झाल्यानंतर ते सूत रंगविण्यास योग्य होते. नंतर सुरंजीच्या मुळ्यांची पूड सोळा तोळे आणि अर्धा तोळा तुरटी हीं सुताची एक पेळ भिजेल इतक्या पाण्यांत मिश्र करुन त्या मिश्रणांत एकेक पेळ बुडवून काढितात आणि दुसऱ्या भांड्यांत ठेवितात. याप्रमाणे सर्व पेळा बुडवून काढल्यानंतर त्या एक रात्र तशाच राहू देतात. दुसऱ्या दिवशी त्या नदीवर नेऊन धुतात; व फरशीवर उन्हांत वाळवितात, रंग पक्का होण्याकरितां पांच शेर पापडखार व पाव शेर तुरटी यांची एकत्र बारीक पूड करतात. पूड करत असतां त्यांत अडीच शेर तिळाचे तेल मिसळतात. अशा तऱ्हेने तयार केलेली सुमारे वीस तोळे पूड घेऊन ती एक पेळ भिजण्यापुरत्या पाण्यात मिसळतात. नंतर त्या मिश्रणांत पेळ बुडवून बाहेर काढितात आणि न पिळतां रात्रभर तशीच ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्या पेळा एका भांड्यांत घालून ते भांडे विस्तवावर ठेवितात आणि पेळा पाण्याच्या पृष्ठभागाखाली एक इंच राहतील इतके त्यांत पाणी घालून ते कढ-