पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      बकूळ.      ५३

-----

वितात. पेळा कढत असतां त्यांसभोवती वर उचलण्याकरितां जी दोरी बांधलेली असते, त्या दोरीत काठी घालून वर उचलतात. जरूर वाटल्यास ज्यास्त पाणी आंत ओततात. याप्रमाणे दोन तास कढ दिल्यानंतर पेळा बाहेर काढून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी नदीवर नेऊन धुतात व फरशीवर उन्हात वाळवितात. अशा रीतीने दिलेला रंग पक्का बसतो. या पक्कया रंगविलेल्या सुताचा मुख्यत्वे लुगडी व चोळखण विणण्याच्या कामी उपयोग करतात. सत्रंज्या व खारवे रंगविण्याचे काम सुरंजीच्या रंगाचा विशेष उपयोग कारतात. एक एकर जमिनीत सुरंजीच्या मुळ्या सुमारे बारा मणपर्यंत सांपडतात. बाजार तेजीचा असेल तर या मुळ्यांना मणी बारा रुपयेपर्यंत भाव येतो. जाड्या मुळ्यांपेक्षां बारीक मुळ्यांना भाव चांगला मिळतो. कारण बारीक मुळ्यांचा रंग चांगला होतो.

--------------------
३५ बकूळ.

 बकुळीचा वृक्ष भरतखंडांतील बहुतेक सर्व भागांत होतो. कोणी कोणी यास ओवळ असेही म्हणतात. या झाडास पांचवे वर्षी फुले येऊ लागतात. याची फुले लहान, पांढऱ्या रंगाची असुन चक्राकृति असतात. त्याच्या मध्यभागी छिद्र असते. या फुलांना मधुर वास येतो; व फूल वाळल्यानंतर तो कांहीं दिवसपर्यंत कमी कमी प्रमाणात येत असतो. लहान मुली या फुलांच्या माळा करून डोकीत घालतात. या फुलापासून उत्तम प्रकारचे सुगंधि अत्तर काढितात. ही फुले मृदु व सुवासिक असल्यामुळे हौशीलोक उशांत व गिरद्यांत कापसाप्रमाणे भरतात. अगरबत्तीकरितां जो मसाला तयार करितात, त्यांत बकुळीची फुले असतात, बकुळीच्या झाडाला जी फळे येतात. ती पिकली म्हणजे शेंदराप्रमाणे तांबडी होतात. बकुळीच्या फळांचे अंगी तुरटपणा असल्यामुळे ही फळे आवडीने फार करून कोणी खात नाहींत. बकुळीच्या बियांचे तेल निघते, ते जाळण्याच्या, खाण्याच्या व औषधाच्या उपयोगी आहे. आमच्या इकडे लहान मुले ' एकी बेकी' खेळण्याकरिता या बियांचा उपयोग करतात. यापेक्षां या बियांचा कोणी फारसा उपयोग करून घेत नाही. तरी उद्योगी माणसाने या बियांचे तेल काढण्याचा प्रयत्न करून पाहिल्यास फुकट जाणारी एक वस्तू उपयोगात आणल्यासारखें होणार आहे. बकुळीचे लांकुड मजबूत असून ते खाऱ्या पाण्यांत पुष्कळ दिवस टिकते. या लाकडाच्या पेट्या वगैरे घरगुती जिनसा होतात. याशिवाय बकुळीच्या झाडाचा दुसरा एक व्यापारसंबंधी