पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

या दांड्यास शेलार असे म्हणतात. हे सोलून याची भाजी करतात व तुरे तुपांत तळून खातात. गुजराथी लोक कोरफडीचे लोणचे करून खातात. कोरफडीचे पानाची वरची साल तासुन काढिली म्हणजे आंत चिकट, बुळबुळीत व कडू रस निघतो. या रसाला आरंभी रंग नसतो; परंतु हृवा लागल्यावर त्यावर पिवळ्या रंगाची झांक मारू लागते. झाडाचा जुनाटपणा आणि पाती कापण्याचा हंगाम यांवर रसाचे कमज्यास्त गुण अवलंबून असतात. कोरफडीचे जें चूर्ण करतात, ते हिरवट पिवळ्या रंगाचे असते. कोरफडीचा बलक पाण्यांत विरघळवून त्यांत ‘टिंकचर ऑफ आयोडाइन ' किंवा 'क्लोराइड ऑफ गोल्ड ' घातल्याने त्या मिश्रणाला सुंदर गुलाबी रंग येतो. कोरफडीच्या ज्या दुसऱ्या पोटजाती आहेत, त्यांच्याशी हा संयोग केला असता त्या मिश्रणास सदर रंग येणार नाही. कोरफडीचा बलक खोकला, दम वगैरे विकारांवर उत्तम बालोपचारीं औषध आहे. कोरफडीच्या या रसाने जुलाब होऊन मळावाटे कफ पडून जातो व कोठा साफ होतो. वाघचवडा झाला असतां कोरफडीचे पान हळद घालून ऊन करून बांधतात. गळू, करट वगैरेवर कोरफडीचा मगज बांधतात. कोरफडीचा अंगरस हळदीचे चूर्ण घालून प्राशन केला असता, त्यापासून पांथरी व अपची ( गंडमाळा ) हे रोग दूर होतात; असे शार्ङगधराच्या खालील श्लोकावरून दिसते.

  निशाचूर्णयुतः कन्यारसः प्लीहाऽपचीहरः ॥
 कोरफडीचा ताजा रस काढून तो उन्हांत वाळवून ठेवतात; त्याचा अनेक औषधांत उपयोग होतो. रस काढून घेतल्यानंतर जो पानांचा चोथा राहतो, त्यापासून उत्तम प्रकारचे तंतू निघतात. कोरफडांच्या बलकापासून ‘क्रिसामिक असिड ' तयार करतात. क्रिसामिक अॅसिडाच्या योगाने सुती, रेशमी, लोकरीचे व तागाचे कपड्यांना जांभळा, प्याजी, नारिंगी, पिवळा, तपकिरी, करडा वगैरे निरनिराळे रंग देतां येतात, क्रिसामिक अॅसिड खालील रीतीने तयार करतात. कोरफडीच्या पातीं मुळाजवळ कापाव्या म्हणजे त्यांतून दाट रस बाहर पडतो. हा रस एक भाग व नैट्रीक अॅसिड आठ भाग या दोहोंचे मिश्रण तांब्याच्या किंवा दुसऱ्या ओतीव भांड्यांत कढवावे. मिश्रण कढू लागताच त्यावर, तीव्र, रसायनकार्य सुरु होते. ते कार्य बंद झाल्यावर तो द्रव आटवावा व थंड होऊ द्यावा. म्हणजे पिवळी पूड तळी बसते. या पुडीत ' अलोएटिक' आणि ' क्रिसामिक' या दोन अॅसिडांचे मिश्रण असते. सदर पूड थंड पाण्याने धुवून कढत्या अल्कोहालांत टाकली म्हणजे अलोएटीक असिड मात्र त्यांत विद्रुत होते. नंतर तो द्रव थंड होऊ दिला म्हणजे नारिंगी पिवळ्या रंगाची पूड तळी बसते; आणि तोच द्रव नैट्रीक असिडांत घालून