पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      पळस.      ४३

-----

पुष्कळ वेळ कढविला म्हणजे त्याचे क्रिसामिक अॅसिडांत रूपांतर होते. नैट्रिक अॅसिडांत कोरफडीचा बलक घालून त्यावर अॅसिडाचे कार्य होण्याचे बंद होईपर्यंत त्यास तसेच ठेवावे; व त्यांतील बहुतेक नैट्रिक अॅसिड वाफेच्या रूपाने घालवावे; आणि शेष राहील तो थोड्या पाण्याने धुवून त्यास तेवढ्याच वजनाच्या नैट्रिक अॅसिडांत भिजत घालून ठेवावे. नंतर त्यांत पाणी घातले म्हणजे जो पिवळा साका बसतो. तो त्यांतून जांभळे पाणी जाण्याचे बंद होईपर्यंत कढत पाण्याने धुवावा. म्हणजे क्रिसामिक असिड तयार होते. क्रिसामिक असिडांत निरनिराळे दंशक पदार्थ (सेंद्रिय तंतूंना किंवा त्यांच्या पदार्थांना आपोआप पक्के बसणारे असे रंग फारच थोडे आहेत, जे रंग आपोआप पक्के बसत नाहीत, त्यांस ज्या विशेष पदार्थांच्या उपयोगाने पक्के बसवतां येतात, अशा पदार्थास इंग्रजीत मार्डंंट मराठीत दंशक असे नांव आहे ) मिश्र केल्याने निरनिराळे पक्के रंग देतां येतात; आणि एकाच दंशक पदार्थाचा उपयोग करून, निरनिराळ्या कपड्यांवर रंगाच्या अनेक झांकी आणितां येतात. त्या सर्वांची सविस्तर माहिती या पुस्तकांत देतां येणे शक्य नाहीं. कोरफडीचे झाडापासून एक प्रकारचा बोळही तयार करतात.

--------------------
३० पळस.

 पळसाची झाडे देशावर फारशीं नाहींत, परंतु कोंकणांत व गुजराथेत दमण, भडोच, सुरत, गणदेवी, वगैरे ठिकाणी पुष्कळ होतात. ही झाडे फार उंच वाढत नाहींत. संस्कृतामध्ये पळसाला पलाश, किंशुक वगैरे नांवे आहेत, पळसाच्या झाडाला हिंदुधर्मशास्त्रांत बरेच महत्त्व आहे. मौजीबंधनाच्या वेळी ब्राह्मणाने बेलाचा अथवा पळसाचा दंड धारण करावा, असे वचन आहे.

  ब्राह्मणो बैल्वपालाशौ क्षत्रियो वाटखादिरौ ॥
  पैलवौदम्बरौ वैश्यो दंडानंर्हति धर्मतः ॥
      'मनुस्मृति अध्याय'२.
 धर्मशास्त्राप्रमाणे वैद्यकशास्त्रांतही पळसाच्या झाडाला बरेच महत्त्व आहे. पळसाच्या झाडाला तांबड्या रंगाची फुले येतात. झाड फुलले म्हणजे त्याची शोभा अवर्णनीय असते. ही फुलें स्वादु, कडू, उष्ण व वातुळ असून, तृषा, दाह, पित्त, कफ, रक्तदोष, कुष्ठ आणि मूत्रकृच्छ्र यांचा नाश करणारी आहेत. पळसाच्या बिया चापट व तांबड्या रंगाच्या असतात; त्यांस 'पळसपापडी ' असे म्हणतात. या बिया कफ आाण कृमी यांचा नाश करणाऱ्या आहेत.