पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

मोहरीच्या तेलांत तळून खातात. त्यांस ‘पाताळी' अथवा 'पिठा' म्हणतात. हें ताडाचे सर्वसाधारण उपयोग सांगितले. याशिवाय आणखीही शेंकड़ों उपयोग आहेत, ते सर्व सांगावयाचे म्हटल्यास एक स्वतंत्र ग्रंथच होईल. तथापि ताडीचा जो एक विशेष उपयोग आहे, तो सांगूनं हे ताडवर्णन पुरे करू. छापण्याच्या शिळेवर कॉपी वठविण्यात ताडीचा उपयोग करतात. कॉपी लिहून तयार झाल्यावर लिहिलेली बाजू खाली करून कोरी बाजू वर करावी, नंतर स्पंज ताडीत भिजवून हलक्या हाताने त्या कॉपीवरून फिरवावा. नंतर ती कॉपी तशीच शिळेवर ठेवून यंत्राने दाबावी, म्हणजे ताडीचे योगानें कागदावरील अक्षरं शिळेवर वठतात. भेरली जातीच्या तांडाच्या बुंधापासून हलक्या प्रतीचा साबूदाणाही तयार करतात.

--------------------
१७ मेंदी.

 आपल्या इकडे व्यापाराकरितां म्हणून कोणी मेंदीची लागवड करीत नाही; परंतु सिंधमध्यें व पंजाबांत जमिनीची चांगली मशागत करून व्यापाराकरितां म्हणूनच या वनस्पतीची तिकडे मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. आमच्या इकडे बागेला व शेताला कुंपण करण्याकरितां हिची लागवड होत असते. ही झाडें सुमार पुरुष दीड पुरुष उंच वाढतात. झाड दोन वर्षाचे झाले म्हणजे त्यास फुलें येऊ लागतात. चैत्र, वैशाख व ज्येष्ठ या महिन्यांत फुलांचा भर असतो. या फुलांचा दुरून चांगला वास येतो. यासाठी मेंदीचा ताटवा लावणे तो बागेच्या पश्चिम आंगात लावावा म्हणजे चैत्र-वैशाखांतील मंद शीतल वासंतिक वायु त्यावरून वाहत येऊन फुलांतील सुगंधाने मन सुप्रसन्न करतो. या झाडाला बारीक फळांचे मोठमोठे घोस येतात, त्यास 'इसबंद' असे म्हणतात. मुलांची दृष्ट काढावयास हा घेतात. इसबंद थंड आहे. उष्णतेमुळे उठलेल्या गांठींवर मेंदीचा पाला वाटून त्याची वडी करून बसवावी. उष्णतेच्या कोणत्याहि विकारावर मेंदीचा पाला गुणावह आहे. डोकींत खवडा पडला असेल, तर मेंदीचा पाला बारीक वाटून त्याचा एक अंगुळ जाडीचा खवड्यावर लेप करून वर पट्टा बांधावा. चार प्रहरानंतर पट्टा सोडून लेप धुवून खवड्याचे जागी नारळाच्या शेंडीची राख तिळाचे तेलांत खलून लावावी. म्हणजे गुण येतो. याशिवाय आणखी काही औषधी उपयोग या झाडाचे आहेत. गुजराथी व मारवाड़ी लोकांच्या बायका मेंदीचा पाला वाट्न तो हाताच्या व पायांच्या नखांवर बांधून त्यांने नखे रंगवितात. उत्तर-हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या बायकाही, नख व हात रंगविण्यासाठी या पानांचा फार उपयोग करतात. रजपूत लोक रुमालाना वगैरे मेंदीने बदामी रंग देतात. परंतु व्यापारसंबंधीं या झाडाचा मुख्य