पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      ताड.      २५

-----
१६ ताड.

 आपल्या देशांतील सर्व झाडांत ताडाचे झाड उंच आहे. ताडाच्या प्रत्येक भागास निरनिराळी नावे आहेत. आणि प्रत्येक भागाचा कांहींना कांही उपयोग आहेच. तामिल भाषेत 'तालविलास' नांवाचा ताडवृक्षाच्या वर्णनाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथांत ताडवृक्षाचे आठशे उपयोग सांगितले आहेत. ताडाच्या झाडापासून गोंद निघतो. हा गोंद काळा व तकतकीत असतो. पानाच्या देठापासुन तंतु काढतात, त्याच्या दोऱ्या करितात. सिलोन बेटांत शेतकीस लागणारी सर्व दोरखंडे या धाग्याचींच असतात. ताडाच्या झावळ्यांनी लहान लहान झोपड्या शाकारितात. ताडाच्या पानांचे पंखे, छत्र्या, इरली, चटया, टोप्या, टोपल्या, मुलांची निरनिराळी खेळणी, वगैरे शेंकडों जिनसा करितात. 'ताडपत्रवृक्ष' या नांवाची ताडाची जी जात सिंहलद्वीपांत होते, तिची उंची सवाशें हात असून झांवळ्या पंधरा वीस हात लांब असतात. हा 'वृक्ष' सुमारे पाऊणशे ऐशी वर्षे वाचतो आणि इतक्या काळांत एकदांच फळास येतो. याचे फळ हृत्तीच्या मस्तकाएवढे असून त्यांत ताडगोळ्यासारखा गीर असतो, तो खातात. प्राचीन काळीं कागद करण्याची कृति लोकांस माहीत नव्हती, तेव्हा या वृक्षाच्या झावळ्यांची पुस्तकें लिहिण्यास उपयोग करीत असत. तेलंगणांत व ओरिसा प्रांतांत ताडपत्रावर ग्रंथ लिहिण्याची चाल हल्लीही आहे. ताडपत्रावर लिहिलेले जुने ग्रंथ अद्यापिही पाहण्यात येतात. ताडपत्रे लिहिण्याच्या कामांत आणण्यापूर्वी ती पानें दूध-पाण्यात उकडून काढितात, नंतर लोखंडी टाकानें त्यावर अक्षरे खोदून त्यांत शाई भरतात, व वरून गोंद सारवितात. ताडाचे झाडापासून ताडी काढितात, हे सर्वांना विदितच आहे. हा रस शिजवून त्यापासून गुळ, साखर, वगैरे पदार्थ करितात. तीन शेर रसाचा सरासरी अर्धाशेर गुळ होतो. ताडाचे लांकूड उभे चिरून त्याचे पन्हळ करतात. शिंपीचा चुना, कोंबडीच्या अंड्याचा बलक आणि ताडाचा रस, ही एकत्र मिसळून उत्तम प्रकारच्या संदलाचा चुना तयार करतात. या संदल्याने इतकी झिलई येते की, पांढरा संगमरवर आणि या संदल्यानें घोटलेले काम, यांतला भेद ओळखतां येत नाही. आपल्या इकडे ताडाच्या लांकडाचे घोटे करण्याचा विशेष प्रघात आहे. जलोदरावर ताडाचा रस पाजतात. प्लीहारोगावर ताडाच्या पोया जाळून त्याची राख देतात. ताडाचे रसांत तांदुळाचे पीठ कालवून त्याचे पोटीस जखम, करट, व्रण, इत्यादिकांवर बांधल्याने गुण येतो, ताडाच्या झाडाला जी फळे येतात, त्यांस ताडगोळे म्हणतात. ही फळे थंड आहेत, म्हणून उन्हाळ्यांत थंडाईकरिता ती खातात. ही फळे कोवळी असतांना फार रुचकर लागतात. ताडगोळ्याच्या मगजांत पीठ आणि साखर घालून पोळ्या करितात, व त्या पोळ्या तुपांत किंवा