पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      खैर.      २७

-----

उपयोग म्हटला म्हणजे मेंदीच्या फुलांपासून अत्तर काढितात, हा होय. या अत्तराला 'हीना' असे म्हणतात. मेंदीसारख्या क्षुल्लक वनस्पतीपासून ' हीन्या ' सारखें उंची अत्तर होते, हे पाहून परमेश्वराच्या अतर्क्य लीलेचे व मनुष्याच्या शोधक कृतीचे मोठे कौतुक वाटते.

--------------------
१८ खैर.

 खैर हा अरण्यवृक्ष आहे. सह्याद्रीच्या खालच्या प्रदेशांत ही झाडे पुष्कळ आहेत. या झाडाला बारीक तीक्ष्ण कांटे असतात, आणि पाने शमीच्या पानांसारखी बारीक असतात. खैराचे लाकूड फार घट्ट, कठीण, बळकट व टिकाऊ असते, यामुळे साधारण धारेचे हत्यार यावर चालत नाही. खैराचे लाकूड जळण्याला बाभळीच्या लाकडापेक्षाही कणखर असते. या लाकडाचा निखारा लवकर विझत नाही. खैराचे ओले लाकूड सालीसुद्धां बारीक फोडून अर्क काढितात. हा अर्क इमारतीचे चुन्यांत घातला असतां, चुना इतका मजबूत होतो की, त्यास तोफेचा गोळा सुद्धां लागू होत नाही. खैराचे लांकूड रेतीत कितीही वर्षे राहिले तरी कुजत नाहीं. तंबूच्या मेखा, सोटे, वगैरे या लाकडाचे करितात. फाजील श्रमामुळे मनुष्याच्या छातीत रक्त गोठते. त्यावर खेराच्या सालीच्या रसांत हिंग घालून देतात. हाच विकार गुरांस झाला असतां खैराचे सालीचे रसांत नारळाचा अंगरस, तुरटी, हळदीची पूड व मिरपूड घालुन तो रस पाजावा. खैराच्या कोवळ्या तुबऱ्या चार पैसे भार व जिरें एक पैसाभार, ही एकत्र बारीक वाटून ते मिश्रण गाईच्या दुधांत कालवावे, आणि वस्त्रगाळ करून त्यांत खडीसाखरेची पूड घालून रोज सकाळी व सायंकाळी घेतल्यास प्रमेहाचा विकार जातो. याला पथ्य अळणी, तुरीचे वरण, तूप, गव्हाची भाकरी, हें आहे. सदर्हू औषध विशेष गुणावह असल्याबद्दल एका जुनाट पुस्तकांत लेख आहे, सबब तो येथे नमूद केला आहे.

  खदिरात्रिफलाक्काथो महिषीघृतसंयुतः ॥
  विडंगचूर्णयुक्तश्च भगंदरविनाशनः ॥
      'शाङ्गन्धर.'

 खैरसाल, बेहडा, आवळकाठी व हिरडा, या चार औषधांचा काढा, म्हशीचे तूप व वावाडिंगाचे चूर्ण मिळवून घेतला असतां भगंदर रोग दूर होतो. अशाप्रकारचे या झाडाचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत, परंतु या झाडाचा व्यापारसंबंध मुख्य उपयोग झाडापासून मिळणारा कात हा होय. कात करण्याची रीत तालीलप्रमाणे आहे. खैराचे जून झाड तोडून त्याची साल व आंतील गाभ्याचे बारीक बारीक तुकडे करून ते तुकडे मडक्यांत भरून त्यांत पाणी घालतात व कढवितात;