पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

  ततो रसं गृहीत्वा च शीतं क्षौद्रयुतं पिबेत् ॥
  जयेत्सर्वानतीसारान् दुस्तरान् सुचिरोत्थितान् ॥
       'शारङ्गधर.'
 याचा भावार्थ असा की, सोळा तोळे कुड्याची साल आणून ती त्याच वेळेस तांदुळाच्या धुणांत वाटून त्याचा गोळा करावा. तो गोळा जांभळीच्या पानांत गुंडाळून सुताने बांधून त्यावर कणीक लावून वर दाट मातीचा लेप करावा. नंतर त्या गोळ्याचे खाली-वर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घालून गोळयाची माती तांबडी होईतोपर्यंत आंच द्यावी. नंतर तो गोळा बाहेर काढून पाने व माती काढून टाकून पिळून रस काढावा. तो रस थंड झाल्यावर मध मिळवून घ्यावा. तेणेकरून बहुत काळचे दुर्घट अतिसार दूर होतात. कुष्ठरोगावर कुड्याची साल, चित्रक, कडूलिंब, बाहव्याचा मगज, खैर, असाणा, व सात्वीण, यांच्या काढ्यांत हिरडे शिजवून ते मध-तुपाबरोबर खाल्ल्याने गुण येतो; असे अष्टांगहृदयांत वर्णन आहे. कुड्याच्या शेंगांची व फुलांची भाजी करतात. ही भाजी कृमिनाशक आहे. कुंड्याच्या शेंगेत ज्या लांबट बिया असतात, त्यांस ' इंद्रजव ' असे म्हणतात. आणि यावरूनच गुजराथेंत या झाडाला 'इंदर जवनुं वृक्ष' असे नांव आहे. कुड्याच्या पानाच्या पत्रावळी करितात; परंतु त्या वाळवून ठेवण्यासारख्या नसतात. रोजच्या चालू कामाला मात्र त्यांचा उपयोग होतो. कुड्याचे बियांचा म्हणजे इंद्रजवाचा-ताप, अतिसार, कृमि, रक्तातिसार, उल्टी, अजीर्ण वगैरे विकारांवर उपयोग करतात; परंतु त्या सर्वांचे वर्णन या छोटेखानी पुस्तकांत देतां येणे शक्य नाही. आता फक्त कुड्याचे पानांचा जो विशेष उपयोग होण्यासारखा आहे, तो सांगून हा भाग पुरा करूं. कुड्याचे पानांत तंबाखूची विडी करून ओढणे, हे इतर पानांच्या विड्या करून ओढण्यापेक्षा हितकारक आहे असे म्हणतात. याबद्दल आपला अनुभव कोणी प्रसिद्ध केल्यास धूम्रपान करणाऱ्या लोकांचा आरोग्यशास्त्रदृष्ट्या थोडासा फायदा होणार आहे. कारण हल्ली बाजारात विक्रीकरितां ज्या विड्या ठेवलेल्या असतात, त्यांपैकी बऱ्याच विड्या टेंभुरणीच्या पानांच्या असतात. टेंभुरणीच्या पानाची विडी ओढल्याने हृदयांत पिवळा डाग पडतो, इतकंच नव्हे, तर या पानांच्या विडीचें ज्यास्त सेवन केल्यास घशाजवळ कफाची गोळी येऊन कंठशोष होतो, असा एके ठिकाणी लेख आहे; आणि याचा प्रत्यय पाहणे असल्यास टेंभुरणीच्या पानाची विङी मुठीत धरून ओढावी म्हणजे दातास पिवळा डाग पडलेला दिसेल, असेही त्या लेखकाचे म्हणणे आहे. खरोखरच अशा तऱ्हेचा अपाय टेंभुरणीच्या विडीपासन होत असेल, व कुड्याचे पानाची विडी खरोखरच हितकारक असेल, तर टेंभूरणीच्या पानाऐवजी कुड्याची पाने विड़ीकरितां वापरावी हें बरे.

--------------------