पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      फणस.      १५

-----

येथे करितात. मुंबई येथील राणीचे बागेत या जातीचीं कांही झाडे आहेत, असे समजते. विलायतीफणसाची पाने मोठाली असून ती कातरल्यासारखी असतात. याचे लाकूड ठिसळ असते, व याच्या फळांत बी नसते. ही फळे भाजून भाकरी प्रमाणे खातात, आणि म्हणूनच याला ब्रेड़-फ्रूट-ट्री असे म्हणतात. या झाडापासून गोंद निघतो. आपल्या इकडे होणाऱ्या 'कापा' आणि ' बरका' अशा ज्या दोन जाति सांगितल्या, त्यांचे लाकूड पिवळे अथवा थोड्या तपकिरी झांकीचे पिवळे असते. हवा लागल्यावर ते काळसर होते. रंध्याने हे लाकूड चांगले सफाईदार होते आणि म्हणून सुतारकामाला याचा चांगला उपयोग होतो. याच्या पेट्या, पाट, दरवाजे वगैरे अनेक जिनसा करितात. फणसाचा बुंधा नऊ फूट परिघाचा झाला म्हणजे त्या झाडाला फळे येण्याचे बंद होते असे म्हणतात. फणसांतील गऱ्यांची खीर, कढी, फणसपोळ्या वगैरे पदार्थ करतात. तसेच त्यांतील आठळ्यांची खीर, भाजी वगैरे निरनिराळे पदार्थ करण्याची वहिवाट आहे. फणसाची चिवरे गरे मोठ्या आवडीने खातात, व तेणेंकरून ती ज्यास्त दूध देतात. हिरव्या फणसाची भाजी होते व पानांच्या पत्रावळी होतात. वगैरे फणसाच्या झाडाचे सामान्य उपयोग सर्वांना माहीतच आहेत. आतां या झाडाचे जे दुसरे कांहीं उपयोग आहेत, ते सांगून हा भाग पुरा करू. फणसाच्या बुध्यांवर जी आळंबी होतात, त्यांस ‘फणसांबी ' असे म्हणतात. थंडीने वगैरे तोंड फुटले असता त्यावर फणसांबे उगाळून लावितात. फणसाच्या सालीतून काळ्या रंगाचा चीक निघतो, तो पाण्यांत विरघळतो. त्याचे एक प्रकारचे लुकण तयार करतात. या चिकाचा रबर करतां येईल असे कित्येक विद्वान् लोकांचे मत आहे. हल्ली पक्षी धरण्याचे कामी त्याचा उपयोग करतात. कमाऊन प्रांतांत फणसाच्या सालीचा वाख काढतात. फणसाचे लाकूड करवतल्या नंतर त्यांतून जो बारीक भुसा पडतो, तो उकळवून त्यापासून पिवळा रंग करितात. ब्रह्मी लोकांच्या उपाध्यायांचे झगे याच पिवळ्या रंगाने रंगविलेले असतात. हा रंग पक्का होण्यासाठी त्यांत हळद आणि तुरटी मिसळतात. याच रंगांत नीळ घातली म्हणजे हिरवा रंग होतो. फणसाचा व मुळ्यांचाही रंगाचे कामी उपयोग होतो. करटें, गळवें वगैरे लवकर फुटावी म्हणून या झाडाचा चीक त्यावर लावितात. त्वचारोगावर याच्या पानांचा उपयोग होतो व मुळ्या अतिसारावर देतात. असे या झाडाचे कांहीं औषधी उपयोगही आहेत.

--------------------