पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

मोकळे होतात. ते काढून घेऊन उन्हांत वाळवावे. या रीतीने धागे काढले असतां ते फार कमी निघतात, सबब धंदा करू इच्छिणाऱ्या गृहस्थाने पहिल्या रीतीनेच धागे काढावे.

--------------------
९ फणस.

 फणसाचा वृक्ष मोठा होतो. कधी कधी या झाडाची उंची चाळीस फूट पर्यंतही भरते. जगामध्ये जितक्या म्हणून फळांच्या जाति आहेत, त्या सर्वांमध्ये फणसाचे फळ मोठे आहे. कांहीं कांहीं फणस एका गड्याच्या ओझ्याचे सुद्धा असतात, आणि अशाप्रकारे हे फळ वजनदार असल्यामुळे सृष्टिकर्त्या परमेश्वराने ही फळे झाडाच्या बुंध्याला किंवा मोठ्या फांदीला जेथे लहान फांदी फुटते, त्या सांध्यावरच लागण्याची योजना केलेली आहे. इतर वृक्षांप्रमाणे फांदीच्या शेवटाला ही फळे कधीच लागत नाहीत. यावरून जगचालक परमेश्वराच्या लहान थोर कृतीचे जो जो आपण बारकाईने अवलोकन कराल तों तों त्याच्या प्रत्येक कृतीबद्ल आपल्याला कौतुक वाटल्यावांचून खास राहणार नाही. फणसाचे फळ ज्याला आपण फणस असे म्हणतो ते एका फुलापासून झालेले एकच फळ नसून, त्यांतील प्रत्येक गरा हा वेगवेगळ्या एक एक फुलापासून झालेले एक एक फळ आहे. या झाडाला फुलांचे मोठाले झुबके येतात. त्यांत पांढऱ्या रंगाची वेगवेगळाली लहान लहान फुले असतात. त्यांतील जितक्या स्त्री-केसराच्या फुलांशी परागाचा संयोग होतो, तितक्या फुलांची प्रथम वेगवेगळी फळे बनू लागतात; ही फळे म्हणजेच फणसांतील गरे होत. झुबक्यांतील फुले अगदी जवळ जवळ असतात म्हणून त्यांची फळे जसजशी मोठी होत जातात, तसतशी ती एकमेकांस चिकटून जाऊन त्यांचे एक फळासारखे दिसणारे फळ बनते, त्यासच आपण फणस म्हणतो. याबद्लची विशेष माहिती रा० ब: गोखले यांच्या " बगिच्याचे पुस्तकांत " प्रसिद्ध झालेली आहे. फणसामध्ये 'कापा ' व ‘बरका ' अशा दोन जाती आहेत. यांशिवाय ‘रानफणस' आणि विलायतीफणस अथवा ब्रेड-फूट-टी अशा आणखी दोन वेगवेगळ्या जाती आहेत. रानफणस ही जंगलांत होणारी फणसाची एक जात आहे; तिला कोणी कोणी पाटफणस असेही म्हणतात. या रानफणसाची पाने मोठमोठाली असतात. त्याची फळे बहुतकरून कोणी खात नाही; परंतु त्याचे लाकूड टिकाऊ असल्यामुळे त्याच्या होड्या व दरवाजे वगैरे करतात. व त्याच्या रसाचे एक प्रकारचे लुकण तयार करतात. ते मेणाप्रमाणे चिकट असते ते ऊन करून त्याने मातीची व दगडाचीं फुटकी भांडी सांधतात. विलायतीफणस म्हणून जी जात सांगितली, त्याची लागवड दक्षिण-हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश