पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

जसे तुळशीला महत्त्व मिळाले आहे, तसेच मुसलमानी व ख्रिस्ती धर्मांतही तुळशीला पुष्कळ महत्त्व आहे. ख्रिस्तीधर्मसंस्थापक येशूख्रिस्त याच्या पूज्य थडग्यावर कृष्णतुळस रुजली होती, यामुळे तेथील लोक तुळशीला फारच पूज्य मानतात. इतकेच नाही, तर 'सेंट बेसिल डे' म्हणून ग्रीस देशांत एक सणही पाळण्यात येतो. त्या दिवशी तेथील बायका तुळशीची फांदी हातात घेऊन उपाध्यायांकडे जातात व त्यांजकडून त्यावर पवित्र पाणी शिंपडवून परत घरी येतात; नंतर घरांतील सर्व मंडळी त्यांतील थोडा थोडा पाला खातात, व शिल्लक राहिलेला घरांत टांगून ठेवतात. त्यायोगाने घरांत चिलट, डांस, उंदीर वगैरेचा त्रास होत नाही, अशी तिकडे समजूत आहे. मुसलमान लोकांतही ज्या ठिकाणी दर्ग्याजवळ प्रेते पुरतात, तेथे ‘बाबी तुळस' ऊर्फ सबजा लावण्याची चाल आहे. अशा तऱ्हेनें आज जगांत विशेष प्रामुख्यानें प्रचलित असलेल्या तिन्ही धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे.

 आतां वैद्यकशास्त्रदृष्टया तुळशीचे किती महत्त्व आहे ते पाहूं. तुळस ही हवा शुद्ध करणारी वनस्पति आहे, ही गोष्ट हिंदुवैद्यकशास्त्रज्ञांस अति पुरातन काळापासून अवगत आहे; आणि याच तत्त्वावर तुळशीचे झाड दाराजवळ लावण्याची चाल बहुतकरून प्रचारात आली असावी. सन १९०९ सालीं भरलेल्या 'इम्पीरिअल मलेरिया कॉन्फरन्सने ' असे ठरविले की, कृष्णतुळशीच्या योगाने मलेरिया खात्रीने हटतो. तुळशीची झाडे घराजवळ असल्याने डांस, चिलटे वगैरे क्षुद्र जंतूंचा नायनाट होऊन हवा शुद्ध होते, हे तत्त्व आधुनिक विद्वानांनाही पसंत आहे. तुळशीचे रसांत मध घालून दिल्यास मुलाची ओकारी बंद होते, तुळशीचे बी गाईचे दुधात वांटून दिल्यास मुलांची हगवण बंद होते. तुळशीचे बुंधांतील माती व तुळशीची पाने एकत्र चोळून बुधवारी अगर रविवारी नायट्यांस लाविली असतां, नायटे बरे होतात. कृष्णतुळशीच्या पाल्याचा रस डोळ्यांत घातल्यास रातांधळे जाते, तूप, कळीचा चुना व तुळशीचे पानांचा रस, या तीन जिनसा काशाचे भांड्यांत एकत्र करून घोटून लावल्यास गजकर्ण जाते. तुळशीची पाने गुळाशीं खाल्ल्यास, किंवा पानांचा व सुंठीचा काढा करून घेतल्यास ताप बरा होतो. तुळशीचा व माक्याचा रस कानांत घातल्यास फुटलेला कान बरा होते. चाकू वगैरेच्या योगाने झालेल्या लहान जखमेवर रस पिळून चोथा बसविल्यास जखम भरून येते. सर्पदंशावरही तुळशीचा उपयोग होतो. सर्पदंश झालेल्या मनुष्यास तुळशीची मूठभर पाने चावून खाण्यास सांगावी आणि तुळशीची मुळे लोण्यांत वाटून ती दंशाचे जागी बांधावी. थोड्याच वेळांत हा वर लावलेला पांढरा लेप विष ओढून घेऊन काळाकुट्ट होतो. हेमगर्भासारख्या जालीम मात्रा तुळशीचे रसांत