पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


      तुळस.      

-----

उगाळून देतात. वगैरे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आतां या झाडापासून व्यापारोपयोगी असा कोणता जिन्नस तयार करता येतो ते पाहूं.

 हल्ली आपल्या देशांत चहापानाचे प्रमाण किती वाढले आहे हे कोणास सांगावयास पाहिजे असें नाहीं. मुंबई-पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांची गोष्ट तर एका बाजूलाच राहू द्या; परंतु दहा पांच घरांच्या वस्तीच्या गांवांतूनही नियमाने चहापान करणारी माणसे हल्ली नजरेस पडतात. चहाच्या व्यापाराचा सन १९११ सालचा अहवाल नुकताच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून असे दिसून येते की, हल्ली हिंदुस्थानांत एकंदर चहाचे मळे चार हजार चारशे चवदा (४४१४) असुन त्यांप्रीत्यर्थ पांचलक्ष, चौऱ्याहत्तर हजार, पांचशे पंचाहत्तर एकर जमीन गुंतून राहिली आहे. सन १८८५ सालापासुन चहाच्या लागवडीच्या जमिनीचे प्रमाण शंकड़ा एकशे दोनने वाढले आहे. अहवालाच्या साली हिंदुस्थानांत एकंदर २६,८५,२६,१९७ रत्तल चहा उत्पन्न झाला. प्रसिद्ध झालेल्या या माहितीवरून आपल्या देशांत चहापानाचे प्रमाण कसे वाढत आहे, ते वाचकांस कळून येईल.

 अशाप्रकारे आपल्या चा हिंदुस्थान देशांतील केवळ चहाप्रीत्यर्थ दरसाल खर्च होणारे लक्षावधि रुपये वाचविण्याचे सामर्थ्य तुळशीच्या झाडाच्या अंगी आहे, हे खालील हकिकतीवरून वाचकांच्या ध्यानात येईल.

 तुळशीची झाडे मंजिऱ्यांंवर आली म्हणजे त्यांची पाने तोडून ती सावलीत सुकवून ठेवावी. तसेच रानतुळशीची पानेही सुकवून ठेवावी. नंतर या दोन्ही झाडांची हीं सुकलेली पाने एकत्र चुरावीं व डब्यांत भरून ठेवावी, आणि जेव्हा चहा करणे असेल, तेव्हां आधण आलेल्या पाण्यांत ही भुकटी टाकावी. भुकटी घालण्याचे प्रमाण दहा तोळे पाण्यात एक तोळा भुकटी हे असावें. भुकटी टाकताच वर झाकण ठेवून भांडे चुलीवरून खाली उतरावे. नंतर पांच सात मिनिटांनी वरचे झाकण काढून चहा गाळावा. त्यांत दहा तोळे दूध व पांच तोळे साखर घालून तो चहा घ्यावा. हा चहा घेतल्याने चहापान करणारांचे समाधान होऊन जीर्णज्वर, पडसे, अग्निमांद्य वगैरे विकार नाहीसे होतात, व शरीर निरोगी बनते. तरी चहापानभक्तांनी याचा अनुभव घेऊन खात्री पटल्यास चहाप्रीत्यर्थ खर्च होणारे बरेचसे पैसे वाचवावे. तसेंच हा धंदा करू इच्छिणाऱ्या माणसानेही बीनखर्चात मिळणारी चहाची पावडर तयार करून विक्रीस ठेवल्यास हा एक किफायतशीर धंदा होणार आहे. रानतुळशीचा पाला न मिळेल, तर नुसत्या तुळशीच्या पाल्याची पावडर तयार करून ठेवावी. तिचाही चहाचे कामी चांगला उपयोग होतो.

---------------------