पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

असते. घरी जन्माला येणा-या प्रत्येक मुलाची आरोग्य, बौद्धिक तपासणी ही अनिवार्य करण्यात आल्याने मतिमंद मुलं शाळेत जाण्याच्या वयात लक्षात येते. तोवर बराच काळ गेलेला असतो. असे मूल लक्षात येताच तेथील समाज सुरक्षा अधिकारी वा समाज कार्यकत्र्यांच्या पदावर बहुधा महिला कार्यरत असतात, त्या त्यांच्या पालकांना आरोग्य, उपचार, प्रशिक्षण, मार्गदर्शन इत्यादीसाठी गरीब असो वा श्रीमंत शासन या मुलाच्या विशेष काळजीसाठी पालकांना स्वत:हून अतिरिक्त साहाय्य करतात. अशा मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष हा तेथील व्यवस्थेत अमानुष प्रकार मानून दखलपात्र गुन्हा समजला जातो. या व्यवस्थेमुळे मूल मतिमंद असल्यास प्राथमिक स्तरावर उपचार सुरू होतात. फ्रान्समधील एका प्रसूतिगृहात गर्भावस्थेत मूल सामान्य की मतिमंद आहे याची तपासणी करण्याचा विभाग व उपचार केंद्र पाहिल्याचे आठवते.
 शाळापूर्व वयात अशा मुलांची प्रारंभिक आरोग्य व बौद्धिक चाचणी घेऊन अशा मतिमंद मुलांची वर्गवारी केली जाते. मतिमंद मुलांमध्ये मर्यादित बुद्धिमत्ता, भोवतालची परिस्थिती समजण्याची असमर्थता, स्वत:ची काळजी घेता न येणे, अपुरा व्यक्तिविकास, अपुरे सामाजिक समायोजन इत्यादी त्रुटी आढळून येतात. काही मुलांत निर्माण झालेल्या आक्रमक प्रवृत्तीमुळे काही प्रक्षोभकही असतात. त्यांच्या बुद्धिगुणांकाधारे त्यांचे सीमान्त, सौम्य, सर्वसाधारण, तीव्र, अतितीव्र मतिमंद असे वर्गीकरण शिक्षण, प्रशिक्षण, उपचारादी व्यवस्था करण्यात येते. मी अनेक ठिकाणी अशा संस्था पाहिल्या तरी पॅरिसमधील ‘इन्स्टिट्यूट मेडिकल एज्युकेटिव्ह' नावाची संस्था मला या क्षेत्रात आदर्श वाटली. या आदर्शाचे दर्शन प्रवेशद्वारावर असलेल्या या नावानेच झाले. तिथे मतिमंदांना औपचारिक शिक्षण देणा-या शाळा नाहीत की ती वैद्यकीय उपचार व प्रशिक्षण केंद्रे म्हणून विकसित करण्यात आली आहेत.
 १५ मे ९० चा तो दिवस मला चांगला आठवतो. पॅरिसच्या ‘ला डिफेन्स' या नगररचना संकुलास भेट देऊन मी, माझे काही सहकारी मेट्रोने पॅरिसच्या ऑर्ली उपनगराकडे गेलो. स्टेशनच्या बाहेर इन्स्टिट्यूट मेडिकल एज्युकेटिव्हचे संचालक प्राचार्य जातीने बस घेऊन स्वागतास उपस्थित होते. ती संस्थेची ‘स्कूल बस होती. तिच्यातील बैठक व्यवस्था मुलांच्या बारीकसारीक गरजा पाहून केलेली आढळली. दप्तर ठेवायची जागा, वॉटर बॅग हुक, बसल्यावर बांधायचे पट्टे, वयानुरूप सुलभ व्हावी अशी छोटी, मोठी आसने, आतील बालरंजक सजावट, संस्थेत मतिमंद मुलांनी केलेले सहज स्वागत किती सांगावे. आपल्याकडे दुर्लभ वाटावे असे नि काहीसे कोड्यात टाकणारे.

वंचित विकास जग आणि आपण/९६