पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 युरोपात कोणतीही संस्था ते गेल्याबरोबर अपवादानेच दाखवतात. त्यामुळे प्रारंभी प्राचार्यांनी आपली संस्था, कार्यपद्धती, सुविधा इत्यादीची विस्तृत माहिती दिली. अशी माहिती खानपानाच्या अतिथ्यशील वातावरणात दिली जात असल्याने कळत नकळत अनौपचारिक वातावरण निर्माण होत असते. या उपचारानंतर त्यांनी सर्व संस्था दाखवली. पन्नास मतिमंद मुलांच्या शाळेत जवळ-जवळ तेवढाच कर्मचारी वर्ग होता. संचालक, डॉक्टर, शिक्षक, व्यवसाय मार्गदर्शक, समाज कार्यकर्ता, मनोवैज्ञानिक नर्स, कला शिक्षक, संगीतज्ज्ञ किती पदे सांगावीत? या संस्थेत येणाच्या मुलांचे त्यांनी साधारणपणे तीन वर्ग केल्याचे आढळले. १) शिक्षण देता येण्याजोगे मतिमंद २) कौशल्ये शिकविता येण्याजोगे मतिमंद ३) अति मतिमंद.
 शिक्षण देता येण्याजोगी जी मतिमंद मुले असतात त्यांच्यासाठीची शिक्षण व्यवस्था आपल्याकडील शाळांसारखी असली, तरी ती शाळा आपल्यापेक्षा अधिक साधन संपन्न असते. प्रत्येक मुलास स्वतंत्र टेबल, खुर्ची, सनमायकाचे पांढरे शुभ्र फळे, (तिथल्या शाळेत ‘ब्लॅक बोर्ड' हा शब्द इतिहासात जमा झालेला आहे) त्यावर सप्तरंगी स्केच पेननी लिहिण्याची व्यवस्था, स्पष्टीकरणासाठी पेपर-बोर्ड, प्रोजेक्टर, कितीतरी साधने. शिक्षक दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर शाळेत येतात. साधनांची जुळवाजुळव, वर्गरचना, आकृती मुलांना द्यायचे पूरक साहित्य यासाठी हा वेळ. तीच गोष्ट शाळा सुटल्यावर उद्याच्या नियोजनासाठीच्या तासाची. ही तयारी सैद्धांतिक असते. ज्यांचा बुद्धिगुणांक ५0 ते ८0 च्या दरम्यान असतो अशांसाठीच्या या व्यवस्थेत अक्षरज्ञान, उच्चारण, समायोजन, संगीत, चित्रकला असे कितीतरी विषयांचे ज्ञान दिले जाते.
 कौशल्ये शिकविता येण्याजोग्या मतिमंद मुलांच्या विभागात ट्रैफिक पार्क, बँक, रेल्वे स्टेशन, टेलिफोन बूथ, तिकिटे काढायची यंत्रे, शिवाय सुतारकाम, बेकरी, मुद्रण, स्मिथी, फॅब्रिकेशन असे कितीतरी विभाग होते. या विभागात २० मुलांच्या शिक्षणाची सोय होती. १0 ट्रेड्सची सोय करण्यातआली होती. प्राचार्यांनी सांगितले की, आणखी दहा विभाग सुरू करण्याची विस्तार योजना लवकरच कार्यान्वित होईल. मी अभावितपणे उद्गारलो, 'This is too Luxurious.' प्राचार्य उत्तरले, 'Essential too.' त्यांच्या दृष्टिकोनापुढे मी निरुत्तर झालो.
 या विभागात मुलांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जातो. मुलांना स्वतः रस्ता ओलांडता यावा, वाहतुकीचे नियम कळावे, रेल्वेचे वेळापत्रक

वंचित विकास जग आणि आपण/९७