पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


युरोपातील मतिमंद मुलांचे शिक्षण


 युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, ऑस्ट्रिया, जर्मन, नेदरलँड्स, बेल्जियम, लक्झेंबर्गसारख्या देशांना भेटी देऊन तेथील अनेक प्रकारच्या सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या कार्याची पाहणी करण्याची संधी मिळणार म्हटल्यावर मी असोसिएशन ऑफ दि फ्रेंड्स ऑफ फ्रान्स संस्थेच्या निमंत्रणास तत्काळ स्वीकृती देऊन टाकली. अशी स्वीकृती देत असताना या देशातील सामाजिक स्वास्थ्य कार्यक्रमाविषयी मी बरेच ऐकले, वाचले असल्याने एक जिज्ञासा होती. युरोपातील सर्व राष्ट्रांची सरकारे आपापल्या राष्ट्रांचा उल्लेख ‘कल्याणकारी राज्य' असा करत असतात, तो नावापुरता नाही. तिथे मनुष्य सोडाच, सरकार प्राण्यांच्या स्वास्थ्याचाही विचार करते, हे ऑस्ट्रियाच्या दौ-यावर असताना लक्षात आले. अनाथ, अपंग, मतिमंद, अंध, वृद्ध होणे यातनामय खरेच पण असे जीवन जिणे आलेच तर ते युरोपातील देशात यावे, असे तेथील सामाजिक व शैक्षणिक संस्था पाहात असताना क्षणोक्षणी मला जाणवत होते ‘सामाजिक स्वास्थ्याची पंढरी', असा युरोपचा केला जाणारा उल्लेख सार्थच म्हणायला हवा.
 या दौ-यात मी विविध देशांत ज्या सामाजिक व शैक्षणिक संस्था पाहायचे योजले होते त्यात मतिमंद मुलांच्या शाळा पाहण्यास मी अग्रक्रम देत राहायचो. त्याला स्वानुभवी नि स्वदेशी असे कारण होते. आपल्याकडे मतिमंद बालकांच्या प्रश्नांची अक्षम्य आबाळ झाली आहे. मतिमंद बालकांची संख्या व त्यांना शिक्षण, निवास, प्रशिक्षण, मार्गदर्शन देणा-या संस्था यांचे आपल्याइतके विषम प्रमाण क्वचितच अन्यत्र असेल. पॅरिस, लंडन, बर्लिन, म्युनिक, झुरीचसारख्या शहरात आपल्या उलट परिस्थिती मी अनुभवली.
 युरोपात मुले व वृद्ध ही जशी राष्ट्राची जबाबदारी असते तशी अंध, अपंग, मतिमंद, अनाथ बालकांची जबाबदारी तेथील शासन स्वीकारत

वंचित विकास जग आणि आपण/९५